नवलाख तळपती
दीप विजेचे
येथ
उतरली तारकादळे
जणू नगरात
परि स्मरते
आणिक करते व्याकुल
केव्हा
त्या माजघरातिल
मंद दिव्याची
वात !
वाऱ्यावर येथिल
रातराणि ही
धुंद
टाकता उसासे,
चरणचाल हो मंद
परि स्मरतो
आणिक करतो व्याकुल
केव्हा
त्या परसामधला
एकच तो निशिगंध
!
हेलावे भवती
सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान
इमारतींचा थाट
परि स्मरतो
आणिक करतो व्याकुल
केव्हा
तो नदीकिनारा
आणि भंगला घाट
!
बेहोष चढे जलशांना
येथिल रंग
रुणझुणता नूपुर
जीव बने निःसंग
परि स्मरतो
आणिक करतो व्याकुल
केव्हा
तो आर्त मला
जो ऐकविलास
अभंग !
लावण्यवतींचा
लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी
तरारे फेस
परि स्मरती
आणिक करती व्याकुल
केव्हा
ते उदास डोळे,
त्यातिल करुण-विलास
!
|