तुझे नि माझे इवले गोकुळ
दूर आपुले वसवू घरकुल

एकलकोंडी एक टेकडी
दाट तीवरी हिरवी झाडी
मधेच बांधु सुंदर घरटे
रानखगांची भवती किलबिल

घरट्यापुढती बाग चिमुकली
जाईजुईच्या प्रसन्न वेली
कोठे मरवा कुठे मोगरा
सतत उधळितो सुगंध शीतल

त्या उद्यानी सायंकाळी
सुवासिनी तू सुमुख सावळी
वाट पाहशील निज नाथाची
अधिरपणाने घेशिल चाहूल

चंद्र जसा तू येशिल वरती
मी डोळ्यांनी करीन आरती
नित्य नवी ती भेट आपुली
नित्य नवा तो प्रमोद निर्मल
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट - सुखाची सावली (१९६३)
For the printable version of this song, click here.