आनंद सांगूं किती सखे ग आनंद सांगू किती
सीतावल्लभ उद्यां व्हायचे राम आयोध्यापति

सिंहसनिं श्रीराघव बसतां
वामांगी तूं बसशील सीता
जरा गर्विता, जरा लज्जिता
राजभूषणां भूषवील ही, कमनिय तव आकृति

गुरुजन मुनिजन समीप येतिल
सप्त नद्यांचीं जलें शिंपतिल
उभय कुळें मग कर्तार्थ होतिल
मेघाहुनिही उच्चरवांनी, झडतिल गे नौबति

भर्त्यासम तुज जनीं मान्यता
राज्ञीपद गे तुला लाभतां
पुत्राविण तूं होशील माता
अखिल प्रजेच्या मातृपदाची, तुज करणे स्वीकृति

तुझ्याच अंकित होइल धरणी
कन्या होइल मातृस्वामिनी
भाग्य भोगिलें असलें कोणीं ?
फळाफुलांनी बहरुनि राहिल, सदा माउली क्षिति

पतीतपावन रामासंगें
पतितपावना तूंही सुभगे
पृथ्वीवर या स्वर्गसौख्य घे
तिन्ही लोकीं भरुन राहुं दे, तुझ्या यशाची द्युति

महाराणि तूं, आम्ही दासी
लीन सारख्या तव चरणांसी
कधीं कोणती आज्ञा देसी
तुझिया चरणीं लीन राहुं दे, सदा आमुची मति

विनोद नच हा, हीच अपेक्षा
तव भाग्याला नुरोत कक्षा
देवदेवता करोत रक्षा
दृष्ट न लागो आमुचीच गे, तुझिया भाग्याप्रति

ओळखिचे बघ आले पदरव
सांवलींतही दिसतें सौष्ठव
तुला भेटण्या येती राघव
बालिश नयनीं तुझ्या येइ कां, लज्जेला जागृति ?
 
 
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
 
गीतरामायण
For the printable version of this song, click here.