निरोप माझा
कसला घेता
जेथें राघव
तेथें सीता
ज्या मार्गी
हे चरण चालती
त्या मार्गी
मी त्यांच्या
पुढती
वनवासाची मला
न भीति
संगे आपण भाग्य
विधाता !
संगें असता
नाथा, आपण
प्रासादाहुन
प्रसन्न कानन
शिळेस म्हणतिल
जन सिंहासन
रघुकुलशेखर
वरी बैसतां
वनीं श्वापदें,
क्रूर निशाचर
भय न तयांचे
मजसी तिळभर
पुढती मागें
दोन धनुर्धर
चाप त्यां करीं,
पाठिस भाता
ज्या चरणांच्या
लाभासाठीं
दडलें होतें
धरणीपोटीं
त्या चरणांचा
विरह शेवटीं
-
काय दिव्य हें
मला सांगतां
?
कोणासाठीं सदनीं
राहूं ?
कां विरहाच्या
उन्हांत न्हाऊं
?
कां भरतावर
छत्रें पाहूं
?
दास्य करूं
का कारण नसतां
?
कां कैकयि वर
मिळवी तिसरा
?
कां अपुल्याही
मनी मंथरा ?
कां छळितां
मग वृथा अंतरा
?
एकटीस मज कां
हो त्यजितां
?
विजनवास या
आहे दैवीं
ठाउक होतें
मला शैशवीं
सुखदुःखांकित
जन्म मानवी
दुःख सुखावें
प्रीति लाभतां
तोडा आपण; मी
न तोडितें
शत जन्मांचें
अपुलें नातें
वनवासासी मीही
येतों
जाया-पति कां
दोन मानितां
?
पतीच छाया,
पतीच भूषण
पतिचरणांचें
अखंड पूजन
हें आर्यांचें
नारीजीवन
अंतराय कां
त्यांत आणितां
?
मूक राहतां
कां हो आतां
?
कितिदा ठेवूं
चरणीं माथा
?
असेन चुकलें
कुठें बोलतां
क्षमा करावी
जानकिनाथा
|