मुद्रिका अचुक
मी ओळखिली ही
त्यांची
मज सांग अवस्था
दूता, रघुनाथांची
हातांत धनू
तें, अक्षय
भाता पृष्ठीं
विरहांत काय
ते राघव झाले
कष्टी ?
कां श्यामल
वलयें नयनतळीं
चिंतांचीं ?
बसलेत काय ते
लावुन कर कर्मातें
?
विसरलेत काय
ते दुःखें निजधर्मातें
?
करितात अजुन
ना कर्तव्यें
नृपतीचीं ?
सोडिले नाहिं
ना अजुन तयांनीं
धीरा ?
का शौर्याचाही
विसर पडे त्या
वीरा ?
साह्यार्थ असति
ना सैन्यें
सन्मित्रांची
?
इच्छिती विजय
ना त्यांचा
अवघे राजे ?
का लोकप्रीतिला
मुकले प्रियकर
माझे ?
विसरले थोरवी
काय प्रभू यत्नांची
?
का मलाच विसरुन
गेले माझे स्वामी
?
मी दैवगतीने
पिचतां परक्या
धामीं
का स्मृती तयांना
छळिते या सीतेची
?
करतील स्वयें
ना नाथ मुक्तता
माझी ?
धाडील भरत ना
सैन्य, पदाती,
वाजी ?
कळतसे त्यांस
का वार्ता रघुनगरीची
?
का विपत्कालिं
ये मोह तयांच्या
चित्तीं ?
पुसटली नाहिं
ना सीतेवरची
प्रीती ?
करतील मुक्तता
कधिं ते वैदेहीची
?
त्या स्वर्णघडीची
होइन का मी
साक्षी ?
कधिं रामबाण
का घुसेल रावणवक्षीं
?
वळतील पाउलें
कधीं इथें नाथांचीं
?
जोंवरी तयांचें
कुशल ऐकतें
कानीं
तोंवरी सजिव
मी असेन तैशा
स्थानीं
जन्मांत कधीं
का होइल भेट
तयांची ?
|