सांवळा ग रामचंद्र
माझ्या मांडीवर
न्हातो
अष्टगंधांचा
सुवास
निळ्या कमळांना
येतो
सांवळा ग रामचंद्र
माझ्या हातांनीं
जेवतो
उरलेल्या घासांसाठीं
थवा राघूंचा
थांबतो
सांवळा ग रामचंद्र
रत्नमंचकीं
झोंपतो
त्याला पाहतां
लाजून
चंद्र आभाळीं
लोपतो
सांवळा ग रामचंद्र
चार भावात खेळतो
हीरकांच्या
मेळाव्यांत
नीलमणी उजळतो
सांवळा ग रामचंद्र
करी भावंडांसी
प्रीत
थोरथोरांनी
शिकावी
बाळाची या बाळरीत
सांवळा ग रामचंद्र
त्याचे अनुज
हे तीन
माझ्या भाग्याच्या
श्लोकाचे
चार अखंड चरण
सांवळा ग रामचंद्र
करी बोबडे भाषण
त्याशी करितां
संवाद
झालों बोबडे
आपण
सांवळा ग रामचंद्र
करी बोबडे हें
घर
वेद म्हणतां
विप्रांचे
येती बोबडे
उच्चार
सांवळा ग रामचंद्र
चंद्र नभींचा
मागतो
रात जागवितो
बाई
सारा प्रासाद
जागतो
सांवळा ग रामचंद्र
उद्यां होईल
तरुण
मग पुरता वर्षेल
देवकृपेचा वरुण
|