A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज माझ्या अक्षरांना वचन दे

आज माझ्या अक्षरांना वचन दे रसिका तुझे
या स्वरांच्या चांदण्याला गगन दे रसिका तुझे

अक्षरांच्या लोचनांतुन गगन जरि हे निथळले
मी तुझ्यासाठीच केवळ बहर माझे उधळले
कल्पनावेलीस माझ्या सुमन दे रसिका तुझे

मी जगाचे ओठ झालो, बोलतो आहे खरे
दु:खितांचे दु:ख माझ्या अक्षरांतुन पाझरे
आसवें बघण्या व्यथांची नयन दे रसिका तुझे

काळजामाजि फुलांच्या भावना ओथंबल्या
एवढ्यासाठीच रात्री तारकां खोळंबल्या
आज कवितेच्या उषेला किरण दे रसिका तुझे
गीत - रमण रणदिवे
संगीत -
स्वर- सुरेश वाडकर
गीत प्रकार - भावगीत
सुमन - फूल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.