असेच हे कसेबसे
असेच हे कसेबसे
कसेतरी जगायचे
कुठेतरी कधीतरी
असायचे ... नसायचे.
असाच हा गिळायचा
गळ्यांमधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका.
असाच हा श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा.
असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे
हव्याहव्या क्षणासही
नको नको म्हणायचे.
असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे.
कसेतरी जगायचे
कुठेतरी कधीतरी
असायचे ... नसायचे.
असाच हा गिळायचा
गळ्यांमधील हुंदका
कसेबसे तगायचे
धरून धीर पोरका.
असाच हा श्वास तोकडा
पुन्हा पुन्हा धरायचा
असाच जन्म फाटका
पुन्हा पुन्हा शिवायचा.
असेच पेटपेटुनी
पुन्हा पुन्हा विझायचे
हव्याहव्या क्षणासही
नको नको म्हणायचे.
असेच निर्मनुष्य मी
जिथेतिथे असायचे
मनात सूर्य वेचुनी
जनात मावळायचे.
| गीत | - | सुरेश भट |
| संगीत | - | अशोक पत्की |
| स्वर | - | सुरेश वाडकर |
| चित्रपट | - | आम्ही असू लाडके (२००६) |
| ( अन्य स्वराविष्कार- देवकी पंडित ) |



















