A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भास्वर तुज सम भास्वर

भास्वर, तुज सम भास्वर, तूच भारता
भास्वरता तव जगता, दे प्रसन्‍नता
दे प्रबोधता, हरि अधीरता, वितरि वीरता

प्रेमशौर्य दाखविशी संतरक्षणी
भक्तिशौर्य विकसविशी धर्मतारिणी
दया-शौर्य प्रकटविशी दीनपालनी
सदा भारता, नाचे शौर्य तव मनी
सर्वकाल तुज ठायी-
शौर्य-सबलता, अधमदमनता, धर्मसमरता, दीन-अभयता

राम-बाण रामपरशु तुझा भारता
कृष्णचक्र इंद्रवज्र तुझे भारता
भीमाची भीमगदा तुझी भारता
शत्रुंजय संतत तू म्हणुन भारता
शस्त्रास्त्रे विश्वि अशी-
कवण निर्मिता, कवण मंत्रिता, कवण प्रेरिता, कवण कर्षिता

भारतात घनगणवत्‌ कोण गर्जतो?
तो विक्रम, तो प्रताप, चंद्रगुप्त तो
छत्रपती, छत्रसाल, पृथ्वीराज तो
सिंहसंघ अगणित हा वर्णवे न तो
बघुनि शौर्य हे त्याचे-
सकल तत्सुता, येई सजिवता, स्फुरे भुजलता, त्यांचि तत्त्वता

समरशूर, दानशूर, ज्ञानशूर तू
शत्रुंजय, मृत्युंजय, मदनंजय तू
सत्‌प्रियकर, खलभयकर, नतशुभकर तू
गुणसुंदर जनमंगल सुरमंदिर तू
तुझी भारता, प्रभुता-
वाल्मीकीनुता, व्यास-संस्तुता, कृष्ण-वानिता, राम-वंदिता
गीत - कवी गोविंद
संगीत - राम कदम
स्वर-
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
कर्षित - कृश, क्षीण.
कवण - कोण ?
खल - अधम, दुष्ट.
ठाय - स्थान, ठिकाण.
तत्त्वता - खरोखर.
दमन - खोड मोडणे, जिरवणे.
नत - खिन्‍न / नम्र.
नुति - स्तुती.
प्रबोध - जाग, ज्ञान.
भास्वर - तेजस्वी.
वानणे - वाखाणणे. वर्णन करणे.
वितरणे - देणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.