A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बुगडी माझी सांडली ग

बुगडी माझी सांडली ग जाता सातार्‍याला
चुगली नगा सांगू ग माझ्या म्हातार्‍याला

माझ्या शेजारी तरुण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधी खुणेने जवळ बाहतो
कधी नाही ते भुलले ग बाई, त्याच्या इशार्‍याला

आज अचानक घरी तो आला
पैरण फेटा नि पाठीस शेमला
फार गोड तो मजसी गमला
दिला बसाया पाट मी बाई, त्याला शेजार्‍याला

घरात नव्हते तेव्हा बाबा
माझा मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई तोबा तोबा !
वितळू लागे ग लोणी बाई, बघता निखार्‍याला

त्याने आणली अपुली गाडी
तयार जुंपून खिलार जोडी
मीही ल्याले ग पिवळी साडी
वेड्यावाणी जोडीने ग गेलो, आम्ही बाजाराला

येण्याआधी बाबा परतून
पोचणार मी घरात जाऊन
मग पुसतील काना पाहून
काय तेव्हा सांगू मी ग बाई, त्याला बिचार्‍याला
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - राम कदम
स्वर- आशा भोसले
चित्रपट - सांगत्ये ऐका
राग - कालिंगडा
गीत प्रकार - चित्रगीत, लावणी
बुगडी - स्‍त्रियांचे कर्णभूषण.
बाहणे (बाहाणे) - हाक मारणे, बोलावणे.
शेमला - पागोट्याचा पदर.
'सांगत्ये ऐका'ची बुगडी सातार्‍यात जाताना सांडली तरी जनमानसाच्या स्‍मृतीतून कधी विस्मरणात गेली नाही आणि जाणार नाही.

अनेकांचा समज असा आहे की 'मेरा साया' मधील 'झुमका गिरा रे' वरून गदिमांना ही लावणी सुचली. पण खरी गोष्ट अशी आहे की 'सांगत्ये ऐका' १९५९ साली वितरित झाला आणि ज्या 'पाठलाग' (१९६४) साठी गदिमांनी गीतं लिहिली त्या 'पाठलाग'वर 'मेरा साया' बेतलेला होता.

'गदिमा गीत महिमा' मध्ये प्रास्ताविक स्वरुपात प्रसिद्ध झालेल्या 'माडगूळकरांच्या गीतामधली संदर्भ संपन्‍नता' या लेखात शान्‍ता शेळके म्हणतात, " 'झुमका गिरा रे बरेली की बझार में' या हिंदी पारंपरिक गीतामध्ये माडगूळकर झुमक्याच्या जागी 'बुगडी' या मराठमोळ्या कर्णभूषणाची योजना करतात तर 'बरेली' गावाच्या जागी 'सातारा' आणतात. मग ते गीत हिंदीचा पारंपरिक मुखवटा सोडून एकदम मराठी वळणाचेच बनून जाते. मराठी मनाला ते आपलेसे वाटू लागते. माडगूळकरांचे हिंदी वाचनही भरपूर होते.."
यावरून असंही म्हणता येईल की गदिमांच्या 'बुगडी'च्या तुफान लोकप्रियतेमुळे 'मेरा साया' मध्ये ते पारंपरिक गीत घेण्याची बुद्धी झाली असावी.
(संपादित)

गंगाधर महाम्‍बरे
ग. दि. माडगूळकरांची चित्रगीते
सौजन्य- मधुराज पब्‍लिकेशन्‍स्‌ प्रा. लि., पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.