A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गा बाळांनो श्रीरामायण

रघुराजाच्या नगरीं जाउन
गा बाळांनो, श्रीरामायण

मुनिजन-पूनित सदनांमधुनी
नराधिपांच्या निवासस्थानी
उपमार्गांतुन, राजपथांतुनि
मुक्त दरवळो, तुमचें गायन

रसाळ मूलें, फलें सेवुनी
रसाळता घ्या स्वरांत भरुनी
अचुक घेत जा स्वरां मिळवुनी
लय-तालांचें पाळा बंधन

नगरिं लाभतां लोकमान्यता
जाइल वार्ता श्रीरघुनाथां
उत्सुक हो‍उन श्रवणाकरितां
करवितील ते तुम्हां निमंत्रण

सर्गक्रम घ्या पुरता ध्यानीं
भाव उमटुं द्या स्पष्ट गायनीं
थोडें थोडें गात प्रतिदिनीं
पूर्ण कथेचें साधा चित्रण

नका सांगुं रे नाम ग्राम वा
स्वतःस माझे शिष्यच म्हणवा
स्वरांत ठेवा हास्य गोडवा
योग्य तेवढें बोला भाषण

स्वयें ऐकतां नृप शत्रुंजय
संयत असुं द्या मुद्रा अभिनय
काव्य नव्हे, हा अमृतसंचय
आदरील त्या रघुकुलभूषण

नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां?
अवघ्या आशा श्रीरामार्पण
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - भैरवी
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १९/४/१९५६
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.
कांचन - सोने.
नृप - राजा.
नराधिप - राजा / मुख्य.
पुनीत - शुद्ध, पवित्र.
संयत - संयमित.
सर्ग - अध्याय.
स्वये - स्वत:
गदिमा ग्वाल्हेरला विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मुक्काम प्रसिध्द कायदेपंडित प्रिं. करकरे यांच्या बंगल्यावर होता. ग्वाल्हेरच्या साहित्य संस्थेचे ते अध्यक्षही होते. तिथल्या मुक्कामात बोलताबोलता वकिलांनी गीतरामायणासंबंधी चौकशी केली.

वकिल म्हणाले "अण्णासाहेब, इतरही काही गायक आता गीतरामायणाचे कार्यक्रम करायला लागले आहेत. ते रॉयल्टी वगैरे देतात की नाही?" गदिमांनी वस्तुस्थिती सांगितली. करकर्‍यांनी एक कोरा कागद त्यांच्या पुढे सरकवला व म्हणाले, "यावर सही करुन दया".
गदिमांनी विचारले, "कशासाठी?"
"मला वकीलपत्र दिलंय म्हणून. मी तुमचे गीतरामायणाच्या रॉयल्टीचे पैसे वसूल करुन देतो. वकिली फी घेणार नाही."

क्षणात कागद परत करीत गदिमा म्हणाले, "मग गीतरामायण लिहिलं याला काहीच अर्थ उरणार नाही, वकीलसाहेब. अहो, रामनामानं दगड तरले. मग काही गायकमित्र तरले म्हणून काय बिघडलं !.."
करकरे नुसते गदिमांकडे बघतच राहिले. कौतुक, आदर, भक्तिभाव, प्रेम, अनेक संमिश्र छटा त्यांच्या नजरेत तरळत होत्या ! किती हा मनाचा मोठेपणा !

आज गदिमांना जाऊन ३७ वर्षे झाली. आजही गीतरामायणाचे शेकडो कार्यक्रम भारतभर होत असतात, पण सर्वच रॉयल्टी देतात असे नाही.
गदिमांनीच व्यक्त केलेली भावना आम्ही नव्या पिढीने जपली आहे. माडगूळकर कुटुंबियांना कार्यक्रमाचे नुसते निमंत्रण तरी असावे, परवानगी तरी घ्यावी, इतकी माफक अपेक्षा असते आमची. पण सर्वजण पाळतातच असे नाही.

गीतरामायणाच्या शेवटच्या ओळीत गदिमा म्हणतात..

"नच स्वीकारा धना कांचना
नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां?
अवघ्या आशा श्रीरामार्पण"

आमच्या अजून काय वेगळ्या भावना असणार.. "अवघ्या आशा श्रीरामार्पण.."

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण