A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा शब्द नवा

प्रेम प्रेम प्रेम !

हा शब्द नवा, हा अर्थ नवा
हा भाव नवा, भावार्थ नवा

ही नवी हवा, रोमांच नवा
फुलकांचीत गौरव देह नवा
हा देश नवा, हा वेश नवा
आवेश नवा, उन्मेश नवा
प्रेम !

समर्पणास्तव देह हवा
हा अर्थ नवा, हा स्वार्थ नवा
हा स्वार्थ नवा, परमार्थ नवा
जगण्यासाठीं मरण्यामधला
मधुधुंद नवा, आनंद हवा
प्रेम !
सीमेवरून परत जा
[ पौरस - सिकंदर ]

माझ्याहून विद्वान आणि रसिक असलेल्या सर्व प्रेक्षक बंधूंनो आणि इतरांनो- मी शाळेंत असतांना माझा इतिहास कच्चा होता. तरीहि मी हे ऐतिहासिक नाटक लिहित आहे. कारण, माझा भूगोल पक्का होता. त्याचबरोबर बाकीच्या जगाला भूगोल असला तरी भारताला इतिहास आहे, हा माझा अभिमानहि माझेबरोबर होता.

या नाटकांतल्या बर्‍याच गोष्टी इतिहासाला धरून असल्या तरी पुष्कळशा काल्पनिकही आहेत ! पण प्रेमांत आणि युद्धांत सर्व कांही क्षम्य असतं ! म्हणून या चुका !

आपल्या भूमीचा अभिमान त्या भूगीवर जन्म घेणाराला असलाच पाहिजे, असं समजणारा आणि स्वतःहि तसा असणारा, असा मी होतों, आहे- राहीन.

या मातीच्या अभिमानांतून भारतीय जन्मला,
माऊली त्रिवार वंदन तुला
भारतमाते तब चरणाते
आण बाहुनी शब्द बोलते
तुझाच जयजयकार सदोदित देह तुला वाहिला
माऊली त्रिवार वंदन तुला

ही माझी वृत्ति होती.

तुझ्या हितास्तव झगडूं भांडू
तुझ्याचसाठीं रक्तही सांडूं
माते तुझिया अभिमानांतून भारतीय जन्मला
माऊली त्रिवार वंद तुला

ही माझी निष्ठा होती.

ज्या भूमीचे सुपुत्र आम्ही
त्या भूमीच्या येऊ कामीं
रणीं बेहेत्तर मरण येई तर, तोच स्वार्थ साधला
माऊली त्रिवार वंदन तुला

ही माझी भक्ती होती.

भारतीय हें नांव लावतों, थोर मराठी जन्मकुळीं
आणिक जिंकूं आम्ही, जगीं बळी तो कानपिळी
नीच लुटारू ढोंगी फसवा शत्रु आमुच्या गाठीशीं
नसे कल्पना अल्पहि त्याला प्रसंग काळ्या मातीशीं
प्रसन्‍न माती, पवित्र माती, बहुरत्‍ना ही वसुंधरा
बोला हरहर महादेव अन् शिवबाचे त्या नाम स्मरा

ही मला मिळालेली शिकवण होती आणि यांतून जन्माला आलेल्या अभिमानानं हें नाटक जन्माला घातलं. यांत माझा वांटा कष्टाचा- यशाचा वाटा निष्ठेचा एवढं पुरें.

आभार मानून कुणालाहि लाजवीत नाहीं. हें राष्ट्रकार्य आहे, हें या मातीचं काम आहे, असं सांगून सर्वांचा बाळच रहावा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतों- कसला- पुढं चालू लागतो.
(संपादित)

बाळ कोल्हटकर
'सीमेवरून परत जा' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.