A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे प्रभो विभो अगाध किति

हे प्रभो विभो अगाध किति तव करणी ।
मन चिंतुनि हो रत चरणीं ॥

चांदवा नभाचा केला । रवि-चंद्र लटकती त्याला ।
जणुं झुंबर सुबक छताला । मग अंथरली ही धरणी ॥

बाहुलीं मनुष्यें केलीं । त्यां अनेक रूपें दिधलीं
परि सूत्रें त्यांचीं सगळीं । नाचविसी हस्तीं धरुनी ॥
गीत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
संगीत - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
स्वर-
नाटक - मूकनायक
राग - झिंझोटी, खमाज
चाल-चलो गंदेरी हार
गीत प्रकार - नाट्यसंगीत, नांदी
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
विभू - बलाढ्य, महान.
इतर नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना, 'पंचाक्षरी कोल्हटकर' असं म्हणत असत.
शं बा शास्त्री याचं एक मोठं गंमतीदार कारण सांगतात.

आपल्या सगळ्या नाटकांची नांवं कोल्हटकरांनी पांच अक्षरांत बसविली होती. वासुदेव शास्त्रींनी (वा वा खरे) त्यावर एक मजेदार कुरघोडी करायचं ठरविलं. त्यांच्या सगळ्या नाटकांची नांवं त्यांनी पंचअक्षरी तर ठेवलीच, पण स्वतःचं वैशिष्ठय म्हणून, पांचातल्या तिसर्‍या अक्षरावर अनुस्वार दिला.

एका अनुस्वाराने कोल्हटकरांवर मात करायचं समाधान त्यांनी मिळवलं. उग्रमंगल, शिवसंभव, वरवंचना, देशकंटक !

नाटकाचा कर्ता ओळखणं त्यामुळे सोपं झालं, हा एक लाभ !
(संपादित)

शंकर बाळाजी शास्त्री यांच्या पत्‍नी प्रा. तारा शास्त्री यांनी लिहिलेल्या 'स्मृतिरंजन' लेखातून.
तरुण भारत, नागपूर; दीपावली विशेषांक १९७२.
सौजन्य- दै. तरुण भारत, सिद्धार्थ शंकर शास्त्री.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.