A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जन पळभर म्हणतिल

जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'
मी जातां राहिल कार्य काय?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल कांहि का अंतराय?

मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल
कुणा काळजी कीं न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामिं लागतिल
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जातां त्यांचें काय जाय?

अशा जगास्तव काय कुढावें !
मोहिं कुणाच्या कां गुंतावें?
हरिदूता कां विन्मुख व्हावें?
कां जिरवुं नये शान्‍तींत काय?
गीत - भा. रा. तांबे
संगीत - वसंत प्रभु
स्वर- लता मंगेशकर
राग - मल्हार
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १८ ऑगस्‍ट १९२१, अजमेर.
अंतराय - विघ्‍न, अडथळा.
विन्मुख - तोंड फिरवलेला.
नोंद
या कवितेत कवी मनाला सांगत आहे की, जगाचे अडेल या दृष्टीने तू मरणास तयार नसावे, या तुझ्या म्हणण्यात काहीच अर्थ नाही. जगाचे अडणार नाही. इतकेच नव्हे तर जगाला तुझी पर्वाही नाही. अशा बेषर्वा जगाचा मोह धरायचा कशाला? तेव्हा हरिदूतास संमुख होणेच योग्य, असे कवी मनास सुचवीत आहे.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.