जेथें राघव तेथें सीता
निरोप माझा कसला घेता
जेथें राघव तेथें सीता

ज्या मार्गी हे चरण चालती
त्या मार्गी मी त्यांच्या पुढती
वनवासाची मला न भीति
संगे आपण भाग्य विधाता !

संगें असता नाथा, आपण
प्रासादाहुन प्रसन्‍न कानन
शिळेस म्हणतिल जन सिंहासन
रघुकुलशेखर वरी बैसतां

वनीं श्वापदें, क्रूर निशाचर
भय न तयांचे मजसी तिळभर
पुढती मागें दोन धनुर्धर
चाप त्यां करीं, पाठिस भाता

ज्या चरणांच्या लाभासाठीं
दडलें होतें धरणीपोटीं
त्या चरणांचा विरह शेवटीं -
काय दिव्य हें मला सांगतां ?

कोणासाठीं सदनीं राहूं ?
कां विरहाच्या उन्हांत न्हाऊं ?
कां भरतावर छत्रें पाहूं ?
दास्य करूं का कारण नसतां ?

कां कैकयि वर मिळवी तिसरा ?
कां अपुल्याही मनी मंथरा ?
कां छळितां मग वृथा अंतरा ?
एकटीस मज कां हो त्यजितां ?

विजनवास या आहे दैवीं
ठाउक होतें मला शैशवीं
सुखदुःखांकित जन्म मानवी
दुःख सुखावें प्रीति लाभतां

तोडा आपण, मी न तोडितें
शत जन्मांचें अपुलें नातें
वनवासासी मीही येतें
जाया-पति कां दोन मानितां ?

पतीच छाया, पतीच भूषण
पतिचरणांचें अखंड पूजन
हें आर्यांचें नारीजीवन
अंतराय कां त्यांत आणितां ?

मूक राहतां कां हो आतां ?
कितिदा ठेवूं चरणीं माथा ?
असेन चुकलें कुठें बोलतां
क्षमा करावी जानकिनाथा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
राग-मधुवंती
  गीतरामायण
  प्रथम प्रसारण दिनांक- २२/७/१९५५
  ( ह्या ध्वनीफितीतील स्वर-
माणिक वर्मा ( आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण )
ध्वनीफीत सौजन्य- www.gadima.com )