A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झाल्या तिनीसांजा

झाल्या तिनीसांजा करुन सिणगार साजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा

प्रीतीच्या दरबारीचं येणार सरदार
मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार
दिलाच्या देव्हार्‍यात बांधीन मी पूजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा

भेटीत रायाच्या सांगेन मी सारं
सोसवेना बाई मला यौवनाचा भार
तान्हेल्या हरणीला हळूच पाणी पाजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा

त्यांच्याच ओठांचा ओठी रंग लाल
आठवणीने त्यांच्या बाई रंगले हे गाल
धुंद व्हावी राणी, रंगून जावा राजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा

वाटतं सख्याचं वाजलं पाऊल
खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल
घालू कशी मी साद होईल गाजावाजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा

इचारच पडला बिचार्‍या मनाला
येळ का ग व्हावा बाई सख्या सजनाला
बिलगून बसावी शंभूला सारजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा
गीत - दादा कोंडके
संगीत - रामलक्ष्मण
स्वर- उषा मंगेशकर
चित्रपट - तुमचं आमचं जमलं
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.