A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जिण्याची झाली शोककथा

काय ऐकिले, काय पाहिले, काय पुढे आता
जिण्याची झाली शोककथा

मी भूमीवर जगतो आहे अथवा पाताळी
डोळ्यांपुढती दुनिया झाली तमाहून काळी
तनामनावर घाव घालिते एक अनामी व्यथा

अजुनी कानी कढते आहे निंदांची वाणी
वाफ हो‍उनी उडुनी गेले डोळ्यांतील पाणी
मला गिळाया गर्जत आला आठवणींचा जथा

शुद्ध हरपली तरीही राही जिवंत जाणीव माझी
लेप लाविता जळे औषधी जखम पुन्हा जाळी
चालणेच मज अशक्य झाले शोधू कैसा पथा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- सुधीर फडके
चित्रपट - दैवाचा खेळ
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.