कबीराचे विणतो शेले

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम
भाबड्या या भक्तासाठी देव करी काम

एक एकतारी हाती, भक्त गाई गीत
एक एक धागा जोडी जानकीचा नाथ
राजा घनश्याम !

दास रामनामीं रंगे, राम होइ दास
एक एक धागा गुंते रूप ये पटास
राजा घनश्याम !

विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होइ काम
ठायिठायि शेल्यावरती दिसे रामनाम
राजा घनश्याम !

हळूहळू उघडी डोळे पाहि जो कबीर
विणूनिया शेला गेला सखा रघुवीर
कुठे म्हणे राम ?
पट - वस्‍त्र / सोंगट्या, बुद्धिबळे इ. ज्यावर मांडतात ते वस्‍त्र.
गदिमा-पु.ल या जोडीने अनेक सुंदर सुंदर गीते आपल्याला दिली. वानगी दाखल नावे घ्यायची झाली तर 'इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे', 'नाच रे मोरा नाच', 'इंद्रायणी काठी', 'श्रीहरी विदुराघरि पाहुणा', 'इथेच टाका तंबू', 'ही कुणी छेडिली तार', 'जा मुलि शकुंतले सासरी', 'कबीराचे विणतो शेले', 'कुणी म्हणेल वेडा तुला', 'सख्यांनो करु देत शृंगार', 'दूर कुठे राउळात'.. अशी अनेक गीते आहेत.

'त्या तिथे, पलिकडे, तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे' ही कविता प्रथम गदिमांच्या तोंडून ऐकल्यावर पु.ल म्हणाले होते, "महाकवी, तुम्ही लकी ! तुमच्या प्रियेच्या झोपड्याकडे वळताना त्या वळणावर, आंब्याचे वाकडं झाड होतं. आम्ही वाढलो मुंबईत. त्या वातावरणात वळणावर असते, जळाऊ लाकडांची वखार !"

एकदा दोघांची एका गृहस्थांशी ओळख करुन दिली गेली. "हे ग.दि.माडगूळकर हे महाकवी आहेत. गीतरामायण यांनीच लिहिले आहे आणि हे पु.ल.देशपांडे महाराष्ट्राचे महान विनोदी लेखक आहेत." समोरच्या महाशयांचा साहित्याशी अगदी बादनारायण संबंधही नव्हता. ते अगदी निष्पाप आणि निरागसपणे उत्तरले, "व्हय ! पर हे करत्यात काय ?"

त्यावर या दोघांची जी हास्यरेस सुरु झाली ती लवकर थांबेचना. गदिमा म्हणाले "आमची अजून महाराष्ट्रात अशी कुणी जिरवली नव्हती !"

पु.ल चष्मा काढून हसत होते. त्यावर गदिमा म्हणाले, "पुरश्या,चष्मा घाल. चष्मा काढल्यावर तू चोरासारखा दिसतोस ! तू नाटक लिहितोस ना ? असा 'Anticlimax' कधी लिहिला आहेस ? असा कनवाळू माणूस आम्ही कुठे बघितला नाही. आपल्या पोटापाण्याची कोण रे चौकशी करतंय !".

असे हे दोन जिवलग मित्र त्यांच्याबद्दल किती लिहू आणि किती नाही असे होऊन जाते. गीतरामायणातील "त्रिवार जयजयकार रामा" गीतातल्या ओळी जणू गदिमांनी पु.लं साठीच लिहून ठेवल्या आहेत..

"पुलकित पृथ्वी, पुलकित वायु"
.. तसे हे होते, 'पुल'कित गदिमा..

सुमित्र माडगूळकर

( 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. )

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा