A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा

परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा
अंतपार - अखेरची मर्यादा.
कटि - कंबर.
कानडा - वेडावाकडा / दुर्बोध / कर्नाटकी / एक राग.
ठाकणे, ठाके - थांबणे / स्थिर होणे.
सावयव - मूर्त.
नोंद
कर्नाटकातील संत पुरंदरदास विठ्ठलाचे परमभक्त होते. त्यांच्या प्रत्येक पदाचा शेवट 'पुरंदरविठ्ठला' या शब्दाने होतो. त्यांच्या भक्तीची प्रतिमा म्हणून 'पुरंदराचा हा परमात्‍मा', असे संबोधले आहे.

पंढरपूरपासून कर्नाटकची सीमा जवळ आहे. सीमेपलीकडील उत्तर कर्नाटकमध्येसुद्धा वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने आढळतो. 'विठोबा','पांडुरंग' ही नावे तिकडे सर्रास ठेवली जातात.

- सुमित्र माडगूळकर

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. वसंतराव देशपांडे, सुधीर फडके