A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मन माझे भडकुनि गेले

मन माझे भडकुनि गेले आली भ्रांति चित्तासी
म्हणोनिया दैवा झालें ऐसी कारागृहवासी
रामाच्या अभिषेकाने होइल भरत उदासी ॥

मग कौसल्येची सत्ता न पुसे कोणी कैकयिसी
गणती मग माझी कोठे आश्रयहीन ही दासी
जरि सुटले आजचि येथुनि साधि न कार्यासि ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर- केशवराव भोसले
नाटक - रामराज्यवियोग
चाल-झाली अहो राजेंद्रा हरिश्चंद्र
गीत प्रकार - मना तुझे मनोगत, नाट्यसंगीत
('संगीत श्रीरामराज्यवियोग' याचा पूर्वभाग (अंक १,२, ३) कै. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनीं केला आणि उत्तरभाग (अंक ४, ५) रा. गजानन चिंतामणशास्त्री देव यांनीं केला.)

साग्रसंगीत श्रीरामराज्यवियोगाची प्रस्तावना.

संगीत नाटकाचे आद्यकवि कै. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या अकालीं मरणामुळें त्यांचें संगीत 'रामराज्यवियोग' हें नाटक अपूर्ण राहिले आहे, ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. जर त्यांच्या हातून हें पूर्ण झाले असतें तर तें खचित 'सौभद्र', 'शाकुंतल' सारखेंच लोकप्रिय झाल्यावांचून राहिलें नसतें. झाल्या गोष्टीला उपाय नाहीं.

जरी अण्णासाहेबांच्या हातून नाहीं तरी दुसर्‍या कोणाकडून हें आर्धेच राहिलेलें अत्युत्तम नाटक पूर्ण व्हावें, अशी आमची फार दिवस इच्छा होती. पुढे एक दोघांनी पुढील भागांवर तयार केलेले दोन अंकही पाहण्यांत आले. पण त्यांतील संविधानकरचना पूर्वीच्या अंकांतील संविधानकाशी अगदीं विस्कळित असून शिवाय त्यांत भरतभेटीचा अप्रासंगिक भाग असल्यामुळें ते आह्मांस पसंत पडले नाहींत.

मूळ कर्त्याचा हेतु हें नाटक शोक-पर्यवसायी करावयाचा होता, हें आह्मांस माहीत आहे व त्या हेतूचें द्योतक असें नांवही त्यास त्यानें दिलें आहे. तेव्हां तशाप्रकारचे पुढचे दोन्ही अंक करावयास आह्मी रा. गजानन चिंतामण देव यांस सांगितले व त्याप्रमाणे त्यांनी ते करून आणून आह्मांस दाखविल्यावर तें आम्हांस व आमच्या कित्येक विद्वान् मित्रांस पसंत पडले.

कै. अण्णासाहेबांची संविधानसंगति कायम राखून रा. देव यांनीं पुढील भागाची रचना केली आहे व त्यांतील पद्यें गायनकलापटु रा. बाळकोबा नाटेकर यांनीं पसंत केलीं आहेत. म्हणून हाच उत्तरभाग आम्ही पसंत करून तो कै. अण्णासाहेबांच्या 'रामराज्यवियोग'च्या या नव्या आवृत्तीच्या वेळीं त्यांत सामील करून ही संपूर्ण भागाची आवृत्ति छापविली आहे. तेव्हां हिच्या वाचनानें वाचकांची अपूर्ण राहिलेली जिज्ञासा बरीच पूर्ण होईल, अशी आह्मी आशा करितों व कै. अण्णासाहेबांच्या संगीतमंडळीसही या संपूर्ण नाटकाचा प्रयोग करून लोकांच्या मनरंजनांत भर घालण्याविषयीं शिफारस करितों.
(संपादित)

गणेश कृष्ण गर्दे
'संगीत रामराज्यवियोग' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- गणेश कृष्ण गर्दे (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.