A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मन पिसाट माझें अडलें रे

मन पिसाट माझें अडलें रे,
थांब जरासा !

वनगान रान गुणगुणलें;
दूरांत दिवे मिणमिणले;
मधुजाल तमानें विणलें रे,
थांब जरासा !

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलूं बोली;
तिमिराची मोजूं खोली रे,
थांब जरासा !

नुसतेंच असें हें फिरणें
नुसतेंच दिवस हे भरणें
नुसतेंच नको हुरहुरणें रे,
थांब जरासा !
गीत - ना. घ. देशपांडे
संगीत - यशवंत देव
स्वर- कृष्णा कल्ले
गीत प्रकार - मना तुझे मनोगत, भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १९४७.
तम - अंधकार.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.