A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मराठी पाऊल पडते पुढे

खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाचि अनुष्ठीला
भला देखे

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ

स्वराज्यतोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाऊल पडते पुढे !

मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ॥

कोट छातीचा अभंग त्याला
कधी न जातील तडे

माय भवानी प्रसन्‍न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा आज दिवाळी
चला सयांनो अंगणी घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाऊल पडते पुढे !

बच्‍चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाऊल पडते पुढे !

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!
अनुष्ठान - स्थापना / आचरणे.
कोट - तट, मजबूत भिंत.
रिपु - शत्रु.
स्वये - स्वत:
पृथक्‌-
(१)

मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥२॥
भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठ्याळा चि गांठीं देऊं माथां ॥३॥
मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥४॥
अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥५॥
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥६॥
तुकाराम गाथा (९८१)

(२)
अगा स्वधर्मु हा आपुला ।
जरी कां कठिणु जाहला ।
तरी हाचि अनुष्ठिला ।
भला देखैं ॥
ज्ञानेश्वरी (३.२१९) (गीता (३.३५)

(२)
स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई
जय जय रघुवीर समर्थ
या ओळींची रचना समर्थ रामदास यांनी केली असल्याचा सार्वत्रिक समज असला तरी शान्‍ताबाईंनी आयत्या वेळी लिहिलेला हा श्लोक आहे. अगदी रामदासांचाच वाटेल इतका सशक्त.
ही माहिती उलगडून सांगितल्याबद्दल डॉ. अरुणा ढेरे, धनश्री लेले आणि डॉ. माधव खालकर यांचे आभार.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  उषा मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, हेमंतकुमार, मीना खडीकर