A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मावळत्या दिनकरा

मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करां !

जो तो वंदन करी उगवत्या
जो तो पाठ फिरवि मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा.

उपकाराची कुणा आठवण?
'शितें तोंवरी भूते' अशी म्हण;
जगांत भरलें तोंडपुजेपण
धरी पाठिवर शरा !

असक्त परि तूं केलिस वणवण,
दिलेंस जीवन, हे नारायण,
मनीं न धरिलें सानथोरपण
समदर्शी तूं खरा !
गीत - भा. रा. तांबे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- लता मंगेशकर
राग - मारवा
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- ३ ऑक्टोबर १९३५, ग्वाल्हेर.
अर्घ्य - पूजा / सन्मान.
असक्त - उदासीन.
परा - वाणी, भाषा.
परायण - तत्पर / आतूर.
शरा - शस्‍त्र.
सविता - सूर्य.
सान - लहान.
पृथक्‌
'धरी पाठीवर शरा' - तोंड वळवताच वाग्बाण पाठीवर टाकलाच, या अर्थाने.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.