A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी सुखाने नाहले

मी सुखाने नाहले
काल जे स्वप्‍नात आले आज डोळा पाहिले

बावरी भोळी खुळी ग, मी स्वतःशी बोलते
बोलके हितगूज सारे वैभवाशी चालते
शब्द होता भावनेचे मी सुरांतून गाईले

लेउनी सौभाग्यलेणे मी रहावे स्वागता
नाथ येता मी हसावे लाज नयनी जागता
लाडक्या देवासवे मी लीन हो‍ऊन राहिले

अमृताची ही घडी अन्‌ अमृताचे चांदणे
अमृताचा स्पर्श होता काय मागू मागणे
धन्य झाली आज काया, धन्य जीवन जाहले
लेणे - वस्‍त्र / अलंकार / भिंतीवरील अथवा दगडावरील कोरीव काम.
हितगूज - हिताची गुप्‍त गोष्ट.
या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं त्या दिवशी आशाबाईंचा आवाज नेहमीसारखा खुला, स्वच्छ नव्हता. त्यामुळे सुराला किंचित कळत नकळत कणसूर वाटायचा. अर्थात हा दोष गाणं समजणार्‍याच्याच लक्षात येईल असा सूक्ष्म होता.म्हणून आम्ही टेक ओ.के केला. त्यानंतर चार-पाच दिवसांनी आशाबाईंनी जाताजाता सहज विचारलं, "परवाचं गाणं कसं झालं?" मी उत्तरलो, "बरं झालं."

हे ऐकल्यावर आशाबाईंनी शर्माजींना परत ट्रॅक लावायला सांगितला. गाणं परत आपल्या सुरेल आवाजात डब केलं. शर्माजींनी पुन्हा रेकॉर्डिंगचं करण्याचं कारण विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जोगसाहेब गाणं "बरं झालं" म्हणाले.. तेव्हाच ओळखलं की गाणं त्यांच्या मनासारखं झालेलं नाही. नाहीतर त्यांनी "झकास झालं" असं सांगितलं असतं.

संगीत क्षेत्रात नव्याने येणार्‍या गायक-गायिकांना बरंच काही सांगून जाणारा हा प्रसंग मी सुद्धा कसा विसरेन?

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.