A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाचत ना गगनांत

नाचत ना गगनांत । नाथा ।
तारांची बरसात ॥

आणित होती । माणिक मोतीं ।
वरतुनि राजस रात ॥

नाव उलटली । माव हरपली
चंदेरी दरियांत ॥

ती ही वरची ।
देवाघरची दौलत लोक पहात ॥
गीत - गोविंदाग्रज
संगीत - किर्लोस्कर नाटक मंडळी
स्वराविष्कार- पं. जितेंद्र अभिषेकी
मास्टर दीनानाथ
कुमुद शेंडे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - पुण्यप्रभाव
राग - पहाडी
चाल-आनपरी दरबार
गीत प्रकार - नाट्यसंगीत, शब्दशारदेचे चांदणे
मावा (माव) - माया, मोहिनी, जादू / कपट / खोटेपणा, भ्रम.
मुंबई येथील न्यू एलफिन्स्टन थिएटरात 'किर्लोस्कर नाटक मंडळी' ने १-७-१९१६ रोजी केलेला 'पुण्यप्रभाव' नाटकाचा पहिला प्रयोग विशेष रंगला नाही. 'पुण्यप्रभाव गडकर्‍यांचे असे एकच संगीत नाटक आहे की ज्यातील सर्व पदे गडकर्‍यांनी स्वतः केली आहेत. परंतु, 'पुण्यप्रभाव' हे नाटक संगीतासाठी प्रसिद्ध नाही. किंबहुना, गद्याचा वरचष्मा असलेले 'पुण्यप्रभाव' हे मराठी रंगभूमीवरील पहिले संगीत नाटक आहे. 'पुण्यप्रभाव' नाटकाचा पुणे येथील पहिला प्रयोग १८-८-१९१६ रोजी झाला. तेव्हा पासून त्याला शोभेशी लोकप्रियता लाभली. "Greatest possible success," अशी त्यासंबंधीची नोंद गडकर्‍यांनी त्यांच्या रोजनिशीत केली आहे. 'पुण्यप्रभाव' नाटकामुळे गडकर्‍यांना मराठी नाटककारांच्या पहिल्या रांगेत मानाचे स्थान मिळाले. 'किर्लोस्कर नाटक मंडळी'ला सुद्धा मराठी रंगभूमीच्या परिसरात पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त झाली.
परंतु, 'प्रेमसंन्यास' नाटकाच्या लेखनाच्या वेळी गडकर्‍यांना जडलेले कफ-तापादि विकार १९१६ साली अधिकच बळावले होते.

'संगीत पुण्यप्रभाव' नाटकाचा पहिला प्रयोग १-७-१९१६ रोजी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'ने मुंबई येथील रिपन थिएटरात केला. त्यानंतर 'पुण्यप्रभाव' नाटकाचे सर्वस्वी गद्यप्रयोग करायला 'महाराष्ट्र नाटक मंडळी'ने सुरवात केली. 'संगीत पुण्यप्रभाव' नाटकाचे प्रयोग 'किर्लोस्कर नाटक मंडळी' प्रमाणे 'बलवंत संगीत मंडळी' 'शिवराज नाटक मंडळी', 'यशवंत संगीत मंडळी' आणि 'मनोहर स्त्री संगीत मंडळी' या नाट्यसंस्था करीत असत. इंदूरचे अधिपती सवाई तुकोजीराव होळकर यांनी स्थापन केलेल्या (१९१९) 'यशवंत संगीत मंडळी'ची सुरवातच 'पुण्यप्रभाव' नाटकाच्या प्रयोगाने झाली होती. 'ललितकलादर्श नाटक मंडळी'ने 'संगीत पुण्यप्रभाव, नाटकाचे प्रयोग करण्याची सुरवात २३ जानेवारी १९२६ पासून केली.

'किर्लोस्कर नाटक मंडळी'च्या प्रयोगातील मास्तर दीनानाथा यांनी केलेली किंकिणीची भूमिका फार लोकप्रिय झाली होती. या नाटकातील विनोदी पुरुषभूमिका कोणीही अनुभवी नटाने केल्या तर भरपूर हंशा पिकावा अशा आहेत. अब्बल दर्जाच्या नटाच्या कर्तृत्वाच्या दृष्टीने वृंदावन आणि वसुंधरा या भूमिका करणार्‍या नटांचाच विचार करावा लागेल.
(संपादित)

वसंत शांताराम देसाई
'गडकर्‍यांची नाट्यसृष्टी' या वसंत शांताराम देसाई लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सोमैया पब्लिकेशन्स प्रा. लि., मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  पं. जितेंद्र अभिषेकी
  मास्टर दीनानाथ
  कुमुद शेंडे