A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाकी डोळी नीट

नाकी डोळी नीट डाव्या गालावर तीट
केसांची बट जिथं खुलायची, पुरषांची जात तिथं फसायची !

रंगमहालाचा हिरवा रंग, खुलवितो प्रीती तो रंग
घ्यावा अनुभव बसून संग
पडली हवा थंडगार, अंगी झोंबतो शहार
दिव्यातली वात जिथं विझायची, पुरषांची जात तिथं फसायची !

कधी रागाचा नकार लटका, गोर्‍या मानेस मोहक झटका
जाईल उडून डोईचा जरीपटका
तिकडं दावुनिया हुल, इकडं पाडेल भूल
लढत गनिमी काव्याची, पुरषांची जात तिथं फसायची !

मुखी विडा रंगला केशरी, श्वासांत मिसळली कस्तुरी
मुखी विडा रंगला केशरी
एक दोन तीन चार, वाजे तुणतुण्याची तार
मुजर्‍याला मान जिथे लवायची, पुरषांची जात तिथं फसायची !
कस्तुरी - एक अतिशय सुगंधी द्रव्य.
पटका - फेटा / निशाण / ध्वज / ( जरीपटका - मराठ्यांचे निशाण ).

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.