A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
निर्गुणाचा संग धरिला जो

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशोधडी आपणियासी ॥१॥

अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं ॥२॥

एकत्व पाहतां अवघें लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें ॥३॥

ह्मणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा
तुह्मा आह्मा ठावा कैंचे काय ॥४॥
देशोधडी - (देशधडी) देशोदेशी भीक मागत जाण्याची स्थिती, वाताहत.
भावार्थ-

आपल्या सर्वांचे सद्भाग्य असे की, आपल्या साधूसंतानी त्यांच्या उच्च आध्यात्मिक अवस्थेचे दर्शन घडवणारे अभंग लिहिले आहेत. आपण सर्वसामान्य लोक आहोत. त्यामुळे ती अवस्था आपल्या आयुष्यात येणे अवघड आहे. तथापि ती अवस्था असते तरी कशी, याची थोडीशी कल्पना आपल्याला या अभंगांमधून येऊ शकते. असाच एक संत गोरा कुंभार माउलीची उच्च आध्यात्मिक अवस्था दर्शविणारा तिचा हा अभंग. ही अवस्था तिच्या आयुष्यात कशी आली, तेही या अभंगातून समजते. या अभंगात संत नामदेव माउलीला आपली अवस्था कशी झाली आहे आणि ती तशी का झाली आहे, ते सांगितले आहे.

निर्गुणाचा संग, धरिला जो आवडी ।
तेणे केले देशोधडी, आपणलासी ॥१॥

माउली आवडीने निर्गुणाच्या सहवासात सदैव राहिली. निर्गुणाच्या म्हणजेच निर्गुण, निराकार परमात्म्याच्या ! त्या संगाने आपल्याला पार देशोधडीला लावले, असे माउली सांगते. आपणाला म्हणजे कोणाला? आपण म्हणजे संत गोरोबा माउली आणि संत नामदेव माउली या दोघांनाही ! निर्गण निराकार परमात्म्याच्या सहवासात राहिल्याने माणूस देशोधडीला कसा लागू शकतो? असा प्रश्‍न या ओळी वाचताना मनात उभा राहू शकतो. त्याचे उत्तर असे आहे की, देशोधडीला लागते ते माणसाचे आधीचे रूप, आधीचे व्यक्तिमत्त्व ! परमेश्वराच्या सहवासात जी व्यक्ती सदैव राहते, तिचे मूळचे व्यक्तिमत्त्व आपोआप बदलते. सदैव परमेश्वराचे चिंतन केल्याने माणसाला आत्मसाक्षात्कार होतो. जो परमेश्वर आपल्यात आहे, तोच सार्‍या चराचरात भरला आहे, हे प्रत्यक्ष अनुभवातून कळते. ते एकदा कळल्यावर माणसाला सर्वत्र परमेश्वरच दिसू लागतो. संत गोरोबा माउलीचा अवस्थाही तशीच झाली आहे.

अनेकत्व नेले, अनेकत्व नेले ।
एकले सांडिले, निरंजनी ॥२॥

भगवंताने आता आपल्या जीवनातून अनेकत्व नेले आहे, असे माउली सांगते. बरोबरच आहे. सगळीकडे एकच परमेश्वर दिसू लागला आहे. परमेश्वराने जणू आपल्याला निरंजनी म्हणजे निर्जन वनात एकटे सोडले आहे की काय? असे माउलीला वाटते. आजूबाजूला लोक तर आहेत. पण त्यांच्यामध्ये आणि स्वतःतही फक्त परमेश्वरच दिसतो आहे. त्यामुळे आपण निर्जन वनात एकटे पडलो आहोत की काय, असे वाटते आहे.

एकत्व पाहतां, अवघेचि लटिके ।
जे पाहे तितुके, रूप तुझे ॥३॥

जगात एकच परमेश्वर भरला आहे, हे आता प्रत्यक्ष अनुभवाने समजले आहे. त्यामुळे जगातील बाह्य रूपे आता खोटी वाटू लागली आहेत. जे रूप डोळ्यापुढे येते, त्यात भगवंतच दिसू लागला आहे.

म्हणे गोरा कुंभार, ऐका नामदेव ।
तुम्हा आम्हा नाव, कैचे कोण? ॥४॥

विशेष म्हणजे ही अवस्था काही फक्त संत गोरोबा माउलीची नाही. संत नामदेव माउलीची अवस्थाही तशीच झाली आहे. त्या दोघांनी जगाच्या सोयीसाठी जी नावे धारण केली आहेत, त्यांना काहीच अर्थ नाही. दोघेही एकाच परमात्म्याच्या सहवासात सदैव रहायला हवे. मग ही अवस्था कशी असते, याचा प्रत्यक्ष अनुभव आपण कधी ना कधीतरी घेऊ शकू.

डॉ. जोगेश्वर नांदुरकर
सौजन्य- दै. नवशक्ति (प्रकाशन दिनांक अनुपलब्ध.)
(Referenced page was accessed on 3 August 2015)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर भावार्थ

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.