A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पराधीन आहे जगतीं

दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्‍नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्‍निंच्या फळांचा?

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा?

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - यमनकल्याण
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १६/९/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.
उन्‍नती - प्रगती, भरभराट.
क्षय - अधोगती / घट.
कानन - अरण्य, जंगल.
जरा - वृद्धत्‍व. (अजर- जरारहित, वार्धक्यरहित)
तेवि - त्याप्रमाणे, तसे.
तापस - ऋषी.
पतन - अधोगती / नाश.
वत्स - मूल.
वर्धमान - वाढ.
संचित - पूर्वजन्मीचे पापपुण्य.
गीत रामायणातील हे अत्यंत लोकप्रिय गीत. हे गीत सुद्धा माडगूळकर आण्णांकडून जेमतेम एक दिवस आधी मिळालं. फडकेसाहेबांनी या गीताला प्रथम लावलेली चाल दरबारी कानडा या रागात होती. हा राग बराचसा करूण रसाला पोषक असा आहे. हे गीत सुद्धा गीत रामायणातील पहिल्या गीताप्रमाणे direct broadcast करावे लागणार होते. आदल्या रात्रीपर्यंत वर सांगितल्याप्रमाणे चाल लावून झाली होती. सकाळी पावणेआठ वाजता गीताचे प्रक्षेपण असल्याने सर्व वादकांना सकाळी सहा वाजताच स्टुडिऒत बोलावले होते. मी व फडकेसाहेब सकाळी सहा वाजता रिक्षातून आकाशवाणीकडे निघालो.

रिक्षात बाबूजी मला म्हणाले, "जोग, काल मी चाल लावली खरी, पण मला स्वत:ला ती फारशी योग्य वाटत नाही. गीताचा आशय आध्यात्मिक स्वरूपाचा, भरताला समजवण्याचा आहे. लावलेली चाल उगीचच दु:खी वाटते. माझ्या डोक्यात दुसरी एक रचना आहे. स्टुडिओत गेल्यावर मी तुम्हाला ऐकवतो. तुम्ही वादकांना शिकवून बसवून घ्या. तोपर्यंत मी अंतर्‍याचा विचार करतो.

वादकांची रिहर्सल झाली. तोपर्यंत साडेसात वाजून गेले होते. आम्ही सर्व वादक सज्ज झालो. पुरुषोत्तम जोशींचं निवेदन संपलं. स्टुडिओचा तांबडा दिवा लागला आणि बाबूजींनी अतिशय गंभीरपणे ते दहा अंतर्‍याचं गाणं अत्यंत परिणामकारकरित्या सादर केलं.

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण