A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दार उघड बये दार

उधं ग अंबे उधं
दार उघड बये दार उघड

मातले असुर निर्दाळी
घे त्रिशूळ हातीं आतां भद्रकाली
उधं ग अंबे उधं उधं उधं

श्री महांकाळ कोपला वीर बलीभद्र
आकांत भयंकर तांडव करितो रूद्र
खवळली भूतें ही पाच, कराया नाच प्रलय संचरला
वादळांत अवघा भूमिभाग विंचरला

कीं मेघ डफावर कडकड वाजे बिजली
डमडमले डमरू सूर्यमालिका विझली
बेभान करी थैमान, पेटले रान, जलाशय फुटले

घोंघावत वारे सुटले, अस्मानी वादळ उठले
आभाळ कोसळे, उठती डोंगरलाटा
निखळल्या चांदण्या, पृथ्वीगोल उफराटा

"वन्ही तो चेतवावा रे, चेतविताचि चेततो
केल्यानें होत आहे रे, आधीं केलेच पाहिजे"

मावळातल्या मर्द मराठ्या घेई सतीचे वाण
तुला श्री शिवरायाची आण

ऊठ, ऊठ सांडले रक्त, हे देई तुला आव्हान
तुला श्री तुळजाईची आण
भवानी तलवारीची आण

स्वातंत्र्य हिंदवी रक्षाया घे तळहाती प्राण
लढवी अपुले राष्ट्र निशाण
उडवी रिपुची दाणादाण

तुडवित रिपुदल टापाखालीं घोडदौड संचरे
आणि 'हर हर महादेव' गर्जती सह्याद्रीची शिखरे

परदास्य स्तुतीनें सुजली तुटली तोंडे
फोडिले ठायीच्या ठायी कुर्‍हाडि दांडे
कापली शीरें ती निवडुंगाची बोंडे

रणरंगी फुलले पळस, तंबुचे कळस, तणावें तुटती
मुंग्यांची पडली धाड वारूळावरती

चेचले विषारी साप
अरीचे पाप, लागता धाप टेकती गुडघे
मोंगली जुलुम गुर्मीचे बांधले थडगे

भद्रा-भीमा-गोदा-वरदा-कृष्णा-इंद्रायणी
महाराष्ट्राच्या ललाटरेषा जनजीवनदायिनी
नाशिक-त्र्यंबक-आळंदी ही पैठण-पंढरपुरी
तुळजामाता मायभवानी, सोन्याची जेजुरी
शाळु-बाजरी-गहूं-हरभरा-तूर-ऊस लवथवे
कुळीथ-साळी-ज्वारी-नाचणी पीक सुगीला नवे

जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र माझा
आणि रक्तफुलांनीं रणीं बांधली तुझी महापूजा
परकीयातें खडे चारिलें, विजयाचे चौघडे
आणि महाराष्ट्र मंदिरावरी हा भगवा ध्‍वज फडफडे
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
अरि - शत्रु.
ठाय - स्थान, ठिकाण.
पळस - पलाश. 'पळस' या झाडाला वसंत ऋतुत लाल-केशरी रंगाची फुले येतात.
रिपु - शत्रु.
वन्ही - अग्‍नी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.