A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राहिले रे अजून श्वास किती

राहिले रे अजून श्वास किती?
जीवना, ही तुझी मिजास किती?

आजची रात खिन्‍न तार्‍यांची
आजचा चंद्रही उदास किती?

मी कसे शब्द थोपवू माझे?
हिंडती सूर आसपास किती !

दु:ख माझे, विरंगुळा त्यांचा
मी करावे खुळे कयास किती?

ओळखीचे कुणीतरी गेले
ओळखीचा इथे सुवास किती !

हे कसे प्रेम? या कशा आशा?
मी जपावे अजून भास किती?

सोबतीला जरी तुझी छाया
मी करू पांगळा प्रवास किती?
गीत - सुरेश भट
संगीत -
स्वर- सुरेश भट
गीत प्रकार - कविता
आता आपण गझलेच्या आकृतिबंधाविषयी विचार करू.

गझलेच्या पहिल्या शेराला 'मतला' म्हणतात. प्रत्येक शेरात दोन ओळी असतातच. पण मतल्याच्या शेरात दोन्ही ओळीत यमक (काफ़िया) आणि अन्‍त्‍ययमक (रदीफ़) असते. उदा.
राहिले रे अजून श्वास किती?
जीवना ही तुझी मिजास किती?

ह्या माझ्याच एका गझलेतील मतल्याच्या ह्या शेरात दोन्ही ओळीत 'श्वास' आणि 'मिजास' अशी यमके आहेत आणि 'किती' हे अन्‍त्‍ययमक ऊर्फ रदीफ़ आहे. एकच मात्रावृत्त आहे.

गझलेच्या पहिल्या शेरात म्हणजेच मतल्यात दोन्ही ओळीत यमक व अन्‍त्‍ययमक आलेले आहे. पण मतल्यानंतर येणार्‍या प्रत्येक शेराच्या दुसर्‍या ओळीत यमक आणि अन्‍त्‍ययमक येत असते. उदाहरणार्थ-
सोबतीला जरी तुझी छाया
मी करू पांगळा प्रवास किती?

किंवा
हे कसे प्रेम? या कशा आशा?
मी जपावे अजून भास किती?

या दोन शेरांत श्वास, मिजास, प्रवास, भास अशी यमके आलेली आहेत आणि 'किती' हे अन्‍त्‍ययमक आलेले आहे. मतल्यानंतरच्या येणार्‍या प्रत्येक शेराच्या फक्त दुसर्‍या ओळीत यमक आणि अन्‍त्‍ययमक येत असते.

परंतु काही गझलांत अन्‍त्‍ययमक म्हणजे रदीफ़ नसते. अशा गझलांना 'गैर-मुरद्दफ़' म्हणतात.

शेरातील प्रत्येक ओळीला 'मिसरा' म्हणतात. पहिल्या ओळीला 'ऊला मिसरा' म्हणतात तर दुसर्‍या ओळीला 'सानी मिसरा' म्हणतात. शेरात जे सांगायचे असते त्याची प्रस्तावना म्हणजे पहिली ओळ असते. तर दुसरी ओळ म्हणजे पहिल्या ओळीतील प्रस्तावनेचा उत्कट व प्रभावी समारोप असतो. म्हणून शेर लिहिताना दुसरी ओळ लिहिणे, हे अधिक जबाबदारीचे व अधिक अवघड काम असते. नुसते यमक, अन्‍त्‍ययमक आणि वृत्त साधून दुसरी ओळ जमत नसते, तर ती ओळ जे सांगायचे आहे त्याचा शेवट असल्यामुळे, तेवढ्याच ताकदीने पण सहज आली पाहिजे. हे सर्व घडले तरच शेर 'कामयाब' होतो !

गझलेच्या शेवटच्या, कवीचे टोपण नाव असलेल्या शेवटच्या शेराला 'मकता' असे म्हणतात. हा मकता गझल कुणाची हे रसिकांना सांगत असे. पणा आता मकत्याची गरज राहिलेली नाही. पूर्वीच्या काळी छापखाने, नियतकालिके आणि वर्तमानपत्रे अस्तित्वात नव्हती. त्या काळात गझल कुणाची हे कळण्यासाठी शेवटच्या शेरात म्हणजेच मकत्यात 'तखल्लुस' म्हणजेच कवीचे टोपणनाव नमूद केले जाई. पण आता हजारो आणि लाखांच्या संख्येत पुस्तके आणि वर्तमानपत्रे छापली जात असताना तखल्लुसरूपी विमा उतरवण्याची गरज राहिलेली नाही. मी स्वत: तखल्लुस वापरत नाही. आणि शेवटच्या शेरात तखल्लुस घालून एका अन्य उपयुक्त शब्दासाठी लागणारी जागा वाया घालवू नये, असे माझे मत आहे.
(संपादित)

सुरेश भट
'एल्गार' या सुरेश भट यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.