A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सती तू दिव्यरूप मैथिली

दिव्यत्वाला चुकले नाही दिव्य सदा भाळी
सती तू दिव्यरूप मैथिली !

सुमनाहुनि तू कुसुम कोमला
रामप्रभु तुज पती लाभला
वनवासाची चौदा वर्षे पतिव्रते भोगिली !

विजनवासिही रामप्रभुचे
सुख न लाभले सहवासाचे
वनवासातही लंकेमाजी वनवासी राहिली !

शेवट झाला दुष्ट रिपूंचा
कलंक उरला तुज परघरचा
म्हणुनि शुद्धते शुद्धीसाठी अग्‍निचिता स्पर्शिली !

रामराज्य ये आयोध्येवर
भाग्य अडखळे उंबरठ्यावर
लोकराधनेसाठी प्रभुने तुजलाही त्यागिली !

रामायणी तुज दिगंत कीर्ती
सोशिलेस तू पावन मूर्ती
भूमिसुता तू, दिव्यहि अंती, धरणीने रक्षिली !
मैथिली - सीता (मिथिला नगरीची राजकन्‍या).
सुता - कन्या.
सुमन - फूल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.