A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुखमय आशा

सुखमय आशा । विधिने नाशा ।
निशिदिनिं छळिते । घोर निराशा ॥

काव्य कल्पना । भुलवी भुवना ।
अनुभव परि ये । अरसिक ऐसा ॥
गीत - वसंत शांताराम देसाई
संगीत - मास्टर कृष्णराव
स्वर- प्रकाश घांग्रेकर
नाटक - प्रेमसंन्यास
राग - तिलककामोद
ताल-त्रिताल
चाल-जय हरी
गीत प्रकार - नाट्यसंगीत
निशिदिनी - अहोरात्र.
कृतज्ञतेचे अश्रु

माझे परमपूज्य लेखनगुरु,
स्वतंत्र शक्तीचे नाटककार, प्रतिभासंपन्‍न कवि, मार्मिक टीकाकार, कुशल विनोदपंडित व विद्वान् निबंधकार-
रा. रा. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर,
बी. ए., एल्एल्. बी., वकील, खामगांव

संगीत वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजूष, मतिविकार, प्रेमशोधन व वधूपरीक्षा या नाटकांचे व 'सुदाम्याचे पोहे' या लेखसंग्रहाचे कर्ते यांस-

गुरुवर्य तात्यासाहेब,
माझ्यासारख्या विषम स्थितींतल्या आणि असदृश योग्यतेच्या मनुष्याला आपण आज इतकी वर्षे उदार हृदयानें, बरोबरीच्या मित्रपणाचा थोर मान देत आलां; वेळोवेळी माझ्या चुकल्या बालबुद्धीला वडीलपणानें सदुपदेश करीत आलां; कर्धीकधीं उच्छृंखलपणानें माझ्याकडून आपला उपमर्द झाला असतां त्याची बंधुप्रेमानें क्षमाच करीत आलां; आजवर मी लिहिलेल्या वेड्या बांकड्या शब्दांचें पितृतुल्य प्रेमानें प्रोत्साहनपर कौतुकच करीत आला; याप्रमाणें, एक ना दोन, हजारों उपकारांचे आज एक समयावच्छेदें करून स्मरण होऊन, अंतःकरण कृतज्ञतेनें उचंबळून येत आहे ! आणि त्या कृतज्ञतेचे अश्रुच आज मी सानंद भक्तिभावानें आपल्या परमपूज्य चरणीं वाहत आहें.

माझ्या सबंध पुस्तकाची आपण लिहिलेल्या एकाद्या शब्दाइतकीसुद्धां किंमत नाहीं, हें मी जाणून आहें; पण हा पक्ष योग्यतेचा नाही. गोपाळबाळानें भक्तिभावानें वाहिलेल्या फत्तराचीं फुलें झालीं. या कथेंत ऐतिहासिक सत्य नसले तरी तात्त्विक सत्य मात्र खास आहे; तोच प्रकार कृतज्ञतेचाही !

आपलेच लेख वाचून मला हे चार शब्द लिहितां आले; तेव्हां यांत जे चांगले असेल तें आपलेच आहे, त्याचा आपण स्वीकार करलाच; आणि जें वाईट आहे त्याचें तरी क्षमापूर्ण उदारतेनें कौतुक आपल्या इतकें दुसरें कोण करणार?
(संपादित)

राम गणेश गडकरी
दि. २० डिसेंबर १९१२.
'प्रेमसंन्यास' या नाटकाच्या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- परचुरे पुराणिक आणि मंडळी, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.