A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुटले वादळ झाड थरथरे

सुटले वादळ झाड थरथरे, कोसळले घरटे
पाखरू फडफडते एकटे

बळ पंखातील अजून कोवळे
चोचीमधुनी रक्त ओघळे
मुके बापुडे हाक न त्याच्या वाणीतून उमटे

दिशा न दिसती, वाट कळेना
घरी स्वत:च्या दार मिळेना
निराधार वर घरकुल लोंबे अधांतरी उलटे

सर्व जाणत्या अगा ईश्वरा
अंध होसी की होसी बहिरा
अगाध करुणा तुझी हरपली आजच काय कुठे

कळे मनोगत तुज मुंगीचे
कळे न का मग या बाळाचे
अनाथ नाथा ब्रीद होतसे आज तुझे खोटे
ब्रीद - प्रतिज्ञा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.