A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तात गेले माय गेली

तात गेले, माय गेली, भरत आतां पोरका
मागणें हें एक रामा, आपुल्या द्या पादुका

वैनतेयाची भरारी काय माशकां साधते?
कां गजाचा भार कोणी अश्वपृष्ठीं लादतें?
राज्य करणें राघवांचे अज्ञ भरता शक्य का?

वंशरीतीं हेंच सांगे- थोर तो सिंहासनीं
सान तो सिंहासनीं कां, ज्येष्ठ ऐसा काननीं?
दान देतां राज्य कैसे या पदांच्या सेवका?

घेतला मी वेष मुनिचा सोडतांना देश तो
कैकयीसा घेउं माथीं का प्रजेचा रोष तो?
काय आज्ञा आगळी ही तुम्हिच देतां बालका?

पादुका या स्थापितों मी दशरथांच्या आसनीं
याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनीं
चरणचिन्हें पूजुनीं हीं साधितों मी सार्थका

राम नाहीं, चरणचिन्हें राहुं द्या ही मंदिरीं
नगरसीमा सोडुनी मी राहतों कोठें तरी
भास्कराच्या किरणरेखा सांध्यकाळीं दीपिका

चालवीतों राज्य रामा, दुरुन तुम्ही येइतों
मोजितों संवत्सरें मी, वाट तुमची पाहतों
नांदतों राज्यांत, तीर्थीं कमलपत्रासारखा

सांगतां तेव्हां न आले, चरण जर का मागुती
त्या क्षणीं या तुच्छ तनुची अग्‍निदेवा आहुती
ही प्रतिज्ञा, ही कपाळीं पाऊलांची मृत्तिका
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - पूरिया धनाश्री
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २३/९/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- पं. वसंतराव देशपांडे.
अज्ञ - मूर्ख, अजाण.
अश्व - घोडा.
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.
कानन - अरण्य, जंगल.
कोसल - एक (प्राचिन) देश ज्याच्या दक्षिण प्रांताची राजधानी अयोध्या नगरी होती.
पादुका - लाकडी चपला.
भास्कर - सूर्य.
मृत्तिका - माती.
मशक - चिलट.
वैनतेय - गरूड.
संवत्‍सर - वर्ष.
सान - लहान.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण