A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तारिणी नववसन धारिणी

तारिणी नववसन धारिणी ।
वात्सल्य हृदयिं धरुनी करिसी दया स्वजनीं ॥

तळमळे अवघी प्रजा ।
उत्सवीं मग्‍न राजा साधितो शकुनि काजा ।
वैरि घर भरिती स्वैरगति रमति ।
प्रजा जन फिरती रानी ॥
गीत - गोविंदराव टेंबे
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वराविष्कार- मधुवंती दांडेकर
माणिक वर्मा
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - पट-वर्धन
राग - तिलंग
गीत प्रकार - नाट्यसंगीत
काज - काम.
वसन - वस्‍त्र.
'द्रौपदी वस्त्रहरण' प्रसंगावर आजपर्यंत तीनचार नाटके झाली आहेत आणि त्याच प्रसंगावरील नाटक पाहण्याचा प्रस्तुत प्रसंग पुन्हां प्रेक्षकांवर गुदरला आहे ! सारांश, कथानकांत नाविन्य मुळींच नाहीं. तथापि कथानकाला पोषक होणारे प्रसंग कांहींसे नवीन आहेत, अशी माझी समजूत आहे. निर्भेळ नाविन्य कोठें असेल तर तें प्रस्तुतच्या लेखकांत मात्र आहे. कृतीमध्यें नाविन्याची वाण वाचकांना वाटेल तर त्याची भरपाई लेखकाच्या नवीनपणांतून करून घ्यावी. त्याचप्रमाणें नाटकांत धडाडीचे दणदणीत प्रसंग आढळले नाहीत तरी नाटक लिहिण्याची माझी धडाडी पाहून कोणाही वाचकाच्या हृदयांत धडकी बसेल अशी मी खात्री देतो.

प्रत्यक्ष भावजयीच्या वस्त्राला हात घालण्याचा अधमपणा दुर्योधनाकडून होणें हें भारतीय युद्धप्रसंगाचें एक सबळ कारण होऊं शकेल, परंतु जिंकलेल्या दासीची अप्रतिष्ठा करण्याचे अन्य मार्ग मोकळे असतांना ते सर्व सोडून, स्वतःच्या घराण्यांतील स्त्रीचें वस्त्र भरसभेत सोडण्याचा अश्लील अत्याचार दुर्योधनाने कां करावा हा प्रश्न राहतोच. दुर्योधनाच्या या कृतीच्या मुळाशी थोडासा काल्पनिक हेतु लेखकाने जोडला आहे. त्याचप्रमाणे, शकुनी व श्रीकृष्ण यांच्या एकमेकांवर होणार्‍या डाव पेचांना वस्त्राचें (पट) निमित्त कल्पिले आहे. प्रचलित परिस्थितींतील विचारविनिमयाचा पगडा प्रत्येक विषयावर अंशतः तरी बसत असतो, असें म्हणतात. लेखकापेक्षां वाचकांवर वरील जबाबदारी जास्त पडते. चाणाक्ष प्रेक्षकांना किंवा वाचकांना माझ्याच नाटकांत प्रचलित विषयांची छटा दिसून आल्यास, अनायासानें सुखासुखी माझा गौरव झाला, असें मी समजेन. उदाहरणार्थ- किंवा धोक्याची सूचना म्हणून- द्यूताचे निमंत्रण स्वीकारावें किंवा नाहीं याविषयींचा पांडवांमधील वाद, चालू कौन्सिल वादाच्या चालीवर आहे, असें बुद्धया मानल्यास नाटककार व राजकारणपटु असे दोन हुद्दे मला सहज मिळतील, व प्रस्तुत नाटकांतील नकुळाप्रमाणें मिरविणार्‍या कित्येक ग्रंथकारांबरोबर मीही पुढारी म्हणून डौलानें मिरवीन.

रंगभूमीचा थोडासा अनुभव असल्यामुळे पद्यांविषयीं मी फारच बेफिकीर आहे. कारण पात्राच्या मधुर आलापांत शब्दरचनेचा सहज लोप होऊन जातो. तानेच्या वेटोळ्यांत चालींची चालढकल करतां येते. पद्यांचे राग व ताल लिहिले नाहींत. कारण राग व ताल हे लिहिण्याचे विषय नव्हेत, हे कोणीही कबूल करील. शिवाय अधिकारी पुरुष या विषयाचे वाङ्मय प्रत्यहीं प्रसिद्ध करीत आहेत. प्रमुख नट उत्तम गवई असतोच, असा अलीकडे ठराव झाल्यामुळे पद्यांवर राग व ताल लिहिण्याची जबाबदारी पूर्णपणे नाहींशी झाली आहे. कारण बहुतेक नट शास्त्रोक्त गवई असल्यामुळे, कोणतेही पद, कोणत्याही वेळीं कोणत्याही रागांत व कोणत्याही तालांत सहज म्हणू शकतात, हे मी पाहिलें आहे. कसबी नटांना रागाचे किंवा तालाचे बंधन घालणें म्हणजे कलेचा कोंडमारा होय !

बेछूट वृत्तीला बंधन घालणें हें वडील माणसांचे कर्तव्य आहे आणि कवीच्या वृत्तीला नाहीं तरी काव्याच्या वृत्ताला क्वचित् बंधन घालण्याचें कटु कर्तव्य गु. श्री. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी अत्यंत प्रेमाने व उदार अंतःकरणाने बजावले याबद्दल कवितादेवी त्यांची सदैव ऋणी राहील यांत संशय नाहीं. परंतु माझ्या इतकेंच वाचकांनीही त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले पाहिजेत. अत्यंत प्रतिभासंपन्‍न व अधिकारी नाटककारालाच सुचतील अशा त्यांच्या गोड सूचना शिरावर धरण्याचें महद्भाग्य मला लाभले याचा मला अभिमान वाटतो. माझ्याजवळच्या तुटपुंजा शब्दसामुग्रीने माझी कृतज्ञता व्यक्त करणें अशक्य असल्यामुळे केवळ 'मूकनायक' होऊन बसणें बरें. मुद्रकांच्या लीला ग्रंथकारानांच माहीत. प्रसिद्ध ग्रंथकार प्रो. अप्पा- साहेब फडके एम. ए. यांनी नाटकाचीं प्रुफे तपासणें, पद्ये व भाषणे दुरुस्त करणे वगैरे काम मला अत्यंत प्रेमाने सहाय्य केले याबद्दल त्यांचे कितीही आभार मानले तरी थोडेच आहेत.

नाटक रंगभूमीवर आणण्याचे काम यशवंत संगीत मंडळीचे डिरेक्टर महाराष्ट्रकोकीळ रा. शंकरराव सरनाईक यांनी जो अपूर्व उत्साह दाखविला व मंडळीचे इतर नटांनीं व विशेषतः स्टेज डिरेक्टर रा. राजाराम बापू पुरोहित यांनी जी मेहनत घेतली, आणि सर्व नटांनी नाटकांतील प्रसंगांचे फोटो मोठ्या हौसेने दिले याबद्दल रा. सरनाईक व इतर सर्व वर्गाचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

केवळ मित्रप्रेमानें प्रेरित होऊन ज्या अनेक स्‍नेह्यांनी माझ्या धारिष्टाचें कौतुक केलें त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे.

पंजाबचे सुप्रसिद्ध आर्टिस्ट श्री. शर्मा यांनी नाटकाचे सीन तयार करण्याचे काम व भारतकालीन विनशिवणीचे कपडे दर्शनीय करण्याचे कामी कल्पकता दाखवून जे अनेक प्रकारचे सहाय्य केले त्याबद्दल रा. शर्मा यांचे आभार मानणे जरूर आहे.
(संपादित)

गोविंद सदाशिव टेंबे
दि. १५ ऑगस्‍ट १९२४
'संगीत पट-वर्धन' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- गोविंद सदाशिव टेंबे (प्रकाशित)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  मधुवंती दांडेकर
  माणिक वर्मा