A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्या वरदाना जीव

तुझ्या वरदाना जीव भुकेला ।
योग जहाला तुजसह माझा ।
तेचि सुधेची धारा झाली ॥

जो निवाला तुजविण फिरला ।
विसरुनि भाव जिवाला ।
तोंचि निराशा नाशा आली ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वराविष्कार- अजितकुमार कडकडे
अनंत दामले
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - सोन्याचा कळस
राग - मारुबिहाग
ताल-त्रिताल
गीत प्रकार - नाट्यसंगीत
निवणे - शांत होणे.

कोणतीही गोष्ट ज्या वेळीं इच्छा असेल त्या वेळीं होऊं नये, असा एक माझा योगायोग आहे. कै. केशवराव भोसले ह्यांच्या हयातींतच या विषयावरील नाटक रंगभूमीवर यावयाचें पण प्रत्यक्ष तो योग येण्याला बारा वर्षें लागलीं.

१९३० सालच्या जानेवारीपासून 'तुतारी' साप्ताहिकांत 'धांवता धोटा' नांवाची माझी कादंबरी क्रमशः प्रसिद्ध होत होती. तिचा पूर्वार्ध पुस्तकरूपानें निघाला होता पण आज तो बाजारांत नाहीं. उत्तरार्धांचीं दहा प्रकरणें होऊन प्रकाशनाला खंड पडला. नंतर संपादकांनीं राजिनामा दिला आणि पुढें 'तुतारी' ही बंद पडली. नित्याच्या योगायोगाप्रमाणें कादंबरी अपुरी राहिली.

कादंबरी लिहिण्यापूर्वीच हें कथानक नाटकासांठीं योजिलें होतें. कादंबरींत त्याचें स्वरूप अर्थातच जास्त विस्तृत झालें. पेंढारकरांनीं ज्या वेळीं ही कादंबरी नाटकरूपांत आणण्याची उत्सुकता दर्शविली त्या वेळीं मूळ योजनेप्रमाणें हें नाटक आज लिहिलें जात आहे. नाट्यवस्तूंच्या मूलभूत तत्त्वापलीकडे, कांहीं प्रसंगापलीकडे, पात्राच्या स्वभावधर्माच्या साम्याशिवाय नाटक व कादंबरीत इतर फारसें साम्य नाहीं, हें दोन्हीं पुस्तकें वाचणारांस कळून येईल.

नित्याप्रमाणें हेंही नाटक रंगभूमीवर येण्यास अकल्पित अडचणी आल्या. त्या अपमृत्युंतून निभावून नाटक रंगभूमीवर येण्यास सर्व्हंट ऑफ इंडियाचे सभासद श्री. रघुनाथ रामचंद्र बखले ह्यांचे हार्दिक परिश्रमच साधनीभूत झाले.

श्‍रोत्यांना दिवसेंदिवस असह्य होत असलेल्या नाटकांतील संगीताला कांहीं तरी नवीन दिशा लावावी, अशी माझ्याप्रमाणेंच पेंढारकरांचीही इच्छा होती. तिला अनुसरून गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे ह्यांनीं ज्या चालींची योजना केली आहे, ती किती भावनापूर्ण व हृदयंगम आहे, हें श्‍रोत्यांना दिसून येणारच आहे. गायनाच्या कोणत्याही शाखेंतील बुवासाहेबांचें अद्वितीयत्व प्रत्येक नाटकाच्या वेळीं प्रत्ययाला येत आहे.

उस्मानिया, मद्रास आणि मुंबई विश्वविद्यालयांप्रमाणेंच अजमीर बोर्डानें आपल्या विश्वविद्यालयीन उच्च अभ्यासक्रमांत वेळोवेळीं हे नाटक योजल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतों.
(संपादित)

भार्गवराम विठ्ठल वरेरकर
'सोन्याचा कळस' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- त्रिंबक विष्णु परचुरे (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  अजितकुमार कडकडे
  अनंत दामले