A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुला पाहिलें मी नदीच्या

तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथें दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेंतले सावळे !

तुझीं पावलें गे धुक्याच्या महालांत
ना वाजलीं ना कधीं नादलीं
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली..

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे कां उभी तूं, तुझें दुःख झरतें?
जसे संचिताचे ऋतू कोवळे..

अशी ओल जातां तुझ्या स्पंदनांतून
आकांत माझ्या उरीं केवढा !
तमांतूनही मंद तार्‍याप्रमाणें
दिसे कीं तुझ्या बिल्वरांचा चुडा
गीत - ग्रेस
संगीत - श्रीधर फडके
स्वराविष्कार- सुरेश वाडकर
श्रीधर फडके
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - आई, भावगीत
बिलवर - उच्‍च प्रतीची काचेची बांगडी.
संचित - पूर्वजन्मीचे पापपुण्य.
स्पंदन - कंपन, आंदोलन.
कवी ग्रेस

एक विहीर असावी. अंधारी.
वास्तवाच्या परिघाच्या किंचित बाहेर
किंवा कदाचित आतही, नक्की ठरवता येत नसावं.
तिच्या भोवतीचं सगळंच अगम्य, दुर्बोध. तिच्या दिशेने पाऊल टाकलं की अंगावर शहार्‍याचे कोंब फुटावेत.

मी दोन-तीन पाऊले टाकते
आणि मागे फिरते.
पण विहीर परतू देत नाही.
आत डोकावून पाहणं झेपेल? नको. शक्यतो कडेकडेनेच जावं.
तिच्याबद्दलच्या आकर्षणाने एव्हाना कुतुहल, उत्सुकतेच्या मर्यादा पार केलेल्या असतात.
विहीरही तिचा अदृश्य पगडा घट्ट…. आणखी घट्ट करते.

सर्वत्र ओला, गूढ-काळा वास. त्या वलयात मी गुरफटायला लागते. वाट अधिकच निसरडी होते.
शेवाळलेला फुटका दगडी कठडा. कालातीत असल्यासारखा. कशीबशी त्याला रेलते. त्याच्या आधाराने डोळे गच्च मिटून आत डोकावते.
ऐकू येते ती घुमणारी शांतता. डोळे उघडावे की नाही?
काय असेल..
आणि आपल्याला काय दिसेल?
पाणी खोल असेल? की तिला तळच नसेल? आणि असलाच तळ तर तळाशी……
असतील कदाचित काही नि:श्वास.. उमेदी सुद्धा.
आता हळूहळू डोळे उघडायचे..
उडी मारणं, डुंबणं, तळ गाठणं वगैरे…..
कुणास ठाऊक…

हे नातं आहे, कवी ग्रेस यांच्या कवितांचं आणि माझं..

'गांव'
आभाळ जिथें घन गर्जे
तें गांव मनाशीं निजलें;
अंधार भिजे धारांनी
घर एक शीवेवर पडलें….

अन्‌ पाणवठ्याच्या पाशीं
खचलेला एकट वाडा;
मोकाट कुणाचा तेथें
कधि हिंडत असतो घोडा….

झाडांतुन दाट वडाच्या
कावळा कधींतरि उडतो;
पारावर पडला साधू
हलकेच कुशीवर वळतो….

गावांतिल लोक शहाणे
कौलांवर जीव पसरती;
पाऊस परतण्याआधीं
क्षितिजेंच धुळींने मळती….

- ग्रेस

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.