A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उगा कां काळिज माझें उले

उगा कां काळिज माझें उले?
पाहुनी वेलीवरचीं फुलें

कधी नव्हे तें मळलें अंतर
कधी न शिवला सवतीमत्सर
आज कां लतिकावैभव सले?

काय मना हें भलतें धाडस?
तुला नावडे हरिणी-पाडस
पापणी वृथा भिजे कां जलें?

गोवत्सांतिल पाहुन भावां
काय वाटतो तुजसी हेवा?
चिडे कां मौन तरी आंतलें?

कुणी पक्षिणी पिलां भरविते
दृश्य तुला तें व्याकुळ करितें
काय हें विपरित रे जाहलें?

स्वतःस्वतःशीं कशास चोरी?
वात्सल्याविण अपूर्ण नारी
कळालें सार्थक जन्मांतले

मूर्त जन्मते पाषाणांतुन
कौसल्या का हीन शिळेहुन?
विचारें मस्तक या व्यापिलें

गगन अम्हांहुनि वृद्ध नाहि का?
त्यांत जन्मती किती तारका !
अकारण जीवन हें वाटलें
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र काफी
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १५/४/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- ललिता फडके.
उले - उलणे / उघडणे / आतल्या जोराने फाटणे.
लता (लतिका) - वेली.
वत्स - मूल.
वत्सल - प्रेमळ.
सल - टोचणी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण