A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वाजवी पावा गोविंद

शरदाचे चांदणे, मधुवनी फुलला निशिगंध
नाचतो गोपीजनवृंद, वाजवी पावा गोविंद !

पैंजणे रुणझुणती, मेखला कटिवर किणकिणती
वाहते यमुनाजळ धुंद

वारा झुळझुळतो, फुलांचा सुगंध दरवळतो
सांडतो भरुनी आनंद

धरुनिया फेर हरीभवती, गोजिर्‍या गोपी गुणगुणती
आगळा रासाचा छंद
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.
कटि - कंबर.
पावा - बासरी, वेणु.
मेखला - कमरपट्टा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.