A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विठ्ठला तू वेडा कुंभार

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार !

माती पाणी उजेड वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार !

घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार !

तूच घडविसी तूच फोडिसी
कुरवाळिसि तू तूच ताडिसी
नकळे यातून काय जोडिसी?
देसी डोळे परि निर्मिसी तयांपुढे अंधार !
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.