A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या चिमण्यांनो परत फिरा रे

या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या

दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर
अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर
चुकचुक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या

इथे जवळच्या टेकडीवरती, आहो आम्ही आई
अजून आहे उजेड इकडे, दिवसहि सरला नाही
शेळ्या, मेंढ्या अजुन कुठे ग, तळाकडे उतरल्या

अवतीभवती असल्यावाचुन कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा
या बाळांनो या रे लौकर वाटा अंधारल्या
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- कुंदा बोकिल, लता मंगेशकर
चित्रपट - जिव्हाळा
गीत प्रकार - चित्रगीत
  
टीप -
• या गाण्याचे मधले कडवे, जे सहसा ऐकण्यात येत नाही, ते कुंदा बोकील यांच्या आवाजात आहे. जेव्हा या गाण्याची संपूर्ण ध्वनीफित 'आठवणीतली गाणी'ला मिळेल, तेव्हा ती येथे उपलब्ध करून दिली जाईल.
मराठी सुगम संगीताच्या इतिहासातील काही कलाकृती इतक्या सुंदर होऊन गेल्या आहेत, अजरामर झाल्या आहेत, की त्यांच्याविषयी वाईट सोडाच पण चांगलं बोलताना, लिहिताना अशी भीती वाटते की त्या कलाकृतींच्या शुद्धतेला, परिपूर्णतेला धक्का तर लागणार नाही ना? माझे एक स्‍नेही मला नेहमी सल्ला देतात की समीक्षकांनी भावनेच्या आहारी जाऊन विशेषणं वापरायची नसतात. आपलं स्पष्ट मत मांडायचं असतं. चांगलं-वाईट, योग्य-अयोग्य इतरांना ठरवू दे. त्याचं म्हणणं मानूनही काही बाबतीत मात्र मी अपवाद केला आहे. अशा अपवादात्मक चांगल्या गोष्टींपैकी एक म्हणजे 'या चिमण्यांनो परत फिरा रे' हे गीत.

याचे गीतकार आहेत महाकवी ग. दि. माडगूळकर, संगीतकार श्रीनिवास खळे आणि गायिका अर्थात लता मंगेशकर. आपल्या लेकरांच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या व्याकूळ आईचे हृदयस्पर्शी शब्द गदिमांनी लिहिले आहेत. लाखात एक अशी चाल खळेसाहेबांनी लावली आणि या गीतासाठी (दुसर्‍या कुठल्याही आवाजाचा या गाण्यासाठी आपण स्वप्‍नातही विचार करणार नाही असा) लता मंगेशकरांचा आवाज.. चित्रपट 'जिव्हाळा'.

'गुरूदत्त प्रॉडक्शन्स'च्या 'जिव्हाळा' चित्रपटातील आणखी दोन गाणी लोकप्रिय आहेत पण 'या चिमण्यांनो..'ची बातच काही और आहे. कुठल्याही गायकाला अतिशय कठीण आव्हान वाटेल अशी चाल खळेसाहेबांनी लावली आणि लाताबाई ती गायल्या. अनिल मोहिले यांचे वाद्यवृंद संयोजनही आगळेवेगळे झाले आहे. खरोखरीच अशी गाणी एकदाच होतात.

गीताच्या ध्वनिमुद्रणाची हकिकत खळेसाहेबांनी त्यांच्या खास ढंगात, रंगून जाऊन सांगितली होती.. लता ध्वनिमुद्रण झाल्यावर ते कसं झालं हे ऐकायला कधी थांबत नाहीत, इतकी त्यांना स्वत:बद्दल खात्री असते. परंतु 'या चिमण्यांनो..' गायल्यावर त्या काही क्षण स्तब्ध होत्या. त्यांनी तो टेक पुन्हा ऐकला. त्यानंतर त्यांनी खळेसाहेबांना माझं मत विचारलं. ते अर्थातच खूष होते, समाधानी होते. लतादीदी त्यांचा निरोप घेऊन जायला निघाल्या. चित्रपट निर्माते आत्माराम त्यांच्याकडे मानधन द्यायला गेले तेव्हा लताबाईंनी मानधन स्वीकारायाला सविनय नकार दिला. त्या म्हणाल्या.. ह्यांचं मानधन मला नको, कारण अशी गाणी क्वचितच निर्माण होतात आणि गायला मिळतात.. मानधन न घेताच त्या निघून गेल्या."
पुढेही त्यांनी या गीताचा उल्लेख त्यांच्या काही आवडत्या निवडक गाण्यातलं एक, असा केला आहे.

कला ही केवळ प्रसिद्धीसाठी आणि आर्थिक लाभासाठी नाही तर त्या पलीकडेही खूप काही आहे, हे लता मंगेशकरांनी या गोष्टीद्वारे सांगितले आहे. सुगम संगीत गायनाला सूर, ताल याबरोबरच गायकी अलंकार म्हणजे खटका, मुरकी, आलाप, ताना, दमसास, शब्दफेक, शब्दोच्चारण, आवाजाची व्याप्ती, अभिव्यक्ती, गाण्याच्या गरजेनुसार वैविध्य असणारा आवाजाचा पोत, आवाजातले चढ‍उतार ज्यांच्या गायनात शंभर टक्के असतात.. ते लता मंगेशकरांचं गाणं आहे.

किंबहुना या सगळ्या सांगीतिक पैलूंच्या व्याख्याच त्यांच्या गाण्यावरून बनवलेल्या आहेत, असं परिपूर्ण त्यांचं गायन आहे. त्यांच्या शेकडो हजारो गाण्यांची महती वर्णन करणारे तितक्याच संख्येचे अध्याय लिहिता येतील, इतक्या त्या महान गायिका आहेत यात शंकाच नाही. परंतु याही पलीकडे जाऊन कलेकडे बघण्याचा त्यांचा उदात्त, व्यापक दृष्टिकोन अशा काही कथांवरून स्पष्ट होतो आणि त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.