A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या सुखांनो या (१)

या सुखांनो या
एकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या, साथ द्या

विरहांतीचा एकान्‍त व्हा, अधीर व्हा आलिंगने
गालीओठी व्हा सुखांनो भाववेडी चुंबने
हो‌उनी स्वर वेळूचे वार्‍यासवे दिनरात या, गात या

आमुच्या बागेत व्हा लडिवाळ तुम्ही पाखरे
शयनघरच्या या छताची व्हा रुपेरी झुंबरे
होऊ द्या घर नांदते तुम्हीच त्यांना घास द्या, हात द्या

अंगणी प्राजक्त व्हा, सौधावरी व्हा चांदणे
जोडप्याचे गुज जुईचे, चिमुकल्यांचे रांगणे
यौवनी सहजीवनी, दोन्ही मनांचे गीत व्हा, प्रीत व्हा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- आशा भोसले
चित्रपट - या सुखांनो या
गीत प्रकार - चित्रगीत
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.
वेळू - बांबू.
सौध - घरावरची / बंगल्यावरची गच्‍ची.
सुगम संगीताचे ते सुवर्णकालीन मंतरलेले दिवस होते. साल होतं १९७५. एका अजरामर गीताची यावेळी निर्मिती झाली. 'या सुखांनो या'. मराठी संगीतप्रेमींनी ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं अशा ग. दि. माडगूळकर-सुधीर फडके या गीतकार-संगीतकार जोडीचं हे सर्वांसुंदर गीत. कवीश्रेष्ठ सुधीर मोघे यांनी त्याविषयी अतिशय रंगवून ही माहिती सांगितली होती. या कहाणीचं निमित्त मात्र वेगळं होतं. याच द्वयीच्या गीतांवर आधारित शुभारंभाचा कार्यक्रम, 'मंतरलेल्या चैत्रबनात'.

खुद्द सुधीर मोघे यांची संकल्पना असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती 'स्वरानंद' या पुण्यातल्या मान्यवर संस्थेची होती. मोघेसाहेब स्वत: गदिमा-बाबुजी यांचे कडेलोट चाहते आणि त्यांच्या स्वरानंदच्या सहकार्‍यांनी अतिशय प्रेमाने, कडक शिस्तीने या कार्यक्रमाची जडणघडण केली होती. सुगम संगीताच्या रंगमंचीय कार्यक्रमातला हा कार्यक्रम पुढे अफाट लोकप्रिय झाला, ज्यापासून प्रेरित अशा कार्यक्रमांची महाराष्ट्रभर निर्मिती झाली.. अजूनही होत आहे. कार्यक्रमाची अतिशय समर्पक, गोळेबंद संहिता- मोघे यांचीच होती आणि त्यांच्याच भाषेत 'कानाखाली आवाज' असा कार्यक्रम बसला होता.

मोघे यांची फार इच्छा होती, गदिमांनी कार्यक्रमाला उपस्‍थित रहावं परंतु कामाच्या व्यस्‍ततेमुळे गदिमांना ते शक्‍य होणार नव्हतं. कार्यक्रम तर उद्यावर आला होता. मोघे यांनी मग युक्ती केली. बाबुजींशी मुंबईला फोनवर संपर्क साधला. त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं. पलीकडून स्‍पष्ट नकार आला. तरीही मोघे यांनी नेट लावला. 'तुमच्या पिढीचं अलौकिक कार्य आम्ही आजच्या पिढीतले कलाकार रसिकांसमोर मांडायचा प्रयत्‍न करत आहोत. ते बघायला तुम्ही आलंच पाहिजे.' अशी गळ घातली. काय जादू झाली माहित नाही. बाबीजींचा होकार आला.. एवढंच नाही तर गदिमांना सोबत घेऊन येण्याचं आश्वासन दिलं.

प्रत्‍यक्ष कार्यक्रमाला राजाभाऊ परांजपेही आले होते.. म्हणजे एकेकाळची चित्रपट रसिकांना वेड लावणारी ही त्रयी कार्यक्रमाला उपस्‍थित होती. अजून काय पाहिजे? 'बहोत दिया देनेवालेने तुझको, आंचलही ना समाये तो क्या कीजे?' अशी कलाकारांची अवस्था झाली. कार्यक्रम उत्तम पार पडला.. तो होणारच होता. कारण नियोजन, झोकून द्यायची वृत्ती, अचूकता यासाठी सुधीर मोघे हे आदरणीय नाव होतं. अर्थातच सहभागी कलाकारांची प्रतिभा हाही यातील एक मोठा भाग होता. श्रोत्यांनी तर कार्यक्रम डोक्यावर घेतलाच पण दिग्‍गजही भारावून गेले.

एखाद्या व्यक्तीला निमंत्रण करावं, तसं सुखांना निमंत्रण करण्याची कल्पना करून गदिमांनी त्यांच्या प्रतिभेचं एक नवीन रूप 'या सुखांनो' मध्ये जे दाखवलं आहे, त्याला खरंच तोड नाही. हे निमंत्रण इतकं भरघोस, परिपूर्ण आहे की सुखांच्या सर्व कानाकोपर्‍यात ते पोहोचलं आहे. गदिमांच्या गीतातील शब्द न्‌ शब्द लाख मोलाचा आहे. बर्‍याच कालखंडानंतर गदिमा-बाबूजी एकत्र आले आणि त्रिकोणाची अपरिहार्य भूजा म्हणजे आशा भोसले.. त्याही होत्या. बाबूजींची मिळून आलेली चाल आणि जोडीला आशा भोसलेंचा स्वर्गीय स्वर. बाबूजींची वर्तूळ पूर्ण करणारी संगीतरचना गाऊन आशाताईंनी डोळ्यांत पाणी आणलं आहे.

'एकटी पथ चालले..' या जोड ध्रुवपदाने 'या सुखांनो या', या ध्रुवपदाला केलेली जोड आणि त्याच पद्धतीने प्रत्येक अंतर्‍याच्या शेवटच्या ओळीने 'या सुखांनो या'ला केलेली वर्तूळ पूर्ण करणारी जोडणी, असा सुंदर आविष्कार संगीतकार म्हणून बाबूजींनी घडविला आहे. २५ वर्षांपूर्वीच्या कार्किर्दीच्या सुरुवातीच्या बाबूजींच्या गीतांत वाद्यवृंद माफक असायचा. या गाण्यात मात्र वाद्यवृंद भरीव आहे पण भडक, कर्कश नाही. संगीत संयोजक श्यामराव कांबळे, हे चित्रपट संगीतातलं एक फार मोठं नाव आहे. नेहमीच बाबूजींचे सहाय्यक असलेल्या श्यामरावजींनी रूपक तालात 'या सुखांनो या' गाण्याची वाद्यवृंद रचना सजवली आहे.

गदिमा, बाबूजी, आशा भोसले हे तीन्ही कायमच जातिवंत प्रतिभावंत. १९५० पासून आपल्या प्रतिभेची चमक दाखवत आले आणि २५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ही चमक कायम राहिली. या सर्व पैलूंमुळे हे गीत, पहिल्या काही मोजक्या श्रेष्ठ गीतांतलं एक म्हंटल्यास अतिशयोक्ती होऊ नये.
'या सुखांनो या' हा एक गीतरुपी प्रेरणादायी शुभसंदेश नवीन पिढीतल्या गीतकार, संगीतकार, गायकांना मिळाला असावा.

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.