A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
यशवंत हो जयवंत हो

मुकेपणाने करिसी सेवा, तूच एकला मला विसावा
दुवा काय मी तुजला द्यावा, यशवंत हो जयवंत हो !

दुबळ्यापोटी जन्मलास तू, नकोस दुबळा ठरू परंतु
पुरेच कर तू माझे हेतू, यशवंत हो जयवंत हो !

बालपणी तुज छळिते विपदा, थोरपणी तू मिळव संपदा
धनवंताना जिंक दहादा, यशवंत हो जयवंत हो !

व्यर्थ जन्म रे विद्येवाचुन, ज्ञान जगातील घेई वेचून
कीर्ती आण तू पायी खेचून, यशवंत हो जयवंत हो !

तू अंधाच्या हाती काठी, तू कुलदीपक आईपोटी
तूच एक मज पुढती-पाठी, यशवंत हो जयवंत हो !
गदिमांची लहानपणी खूप वाईट आर्थिक परिस्थिती होती. अगदी २-३ दिवस स्टेशनवर त्यांनी अगदी पाण्यावर, भूक लागू नये म्हणून पोटाला गच्च फडके बांधून काढले होते. त्यावेळी औंध संस्थानचा राजा 'श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी', एक 'जाणता राजा' होता. त्याने गरीब विद्यार्थांसाठी राहण्याची, जेवणाची व शिक्षणाची मोफत सोय केली होती. गदिमा तिथे 'पंचवटी' या वसतीगृहात ओँधला शिकायला होते. त्यांनी राजाला पाहिले होते. राजाची सुंदर नक्कल सुद्धा ते करत. त्यामुळे त्यांचे 'औंधकर' असे नाव पडले होते.

एकदा गदिमांनी राजा समोर त्याची नक्कल करुन दाखवली. राजा खूप खुश झाला व म्हणाला, "हा मुलगा आपल्या औँध संस्थानचे नाव उज्वल करील.. तू टाकीत जा.. (टाकीत म्हणजे टॉकीत.. सिनेमात).. शिकला नाहीस तरी चालेल.."
त्यांचे शब्द खरे ठरले.. गदिमांनी मराठी चित्रपटात स्वत:चे असे स्थान निर्माण केले.

पुढे १९४९-५० साली गदिमांचा 'सीता स्वयंवर' हा चित्रपट खूप गाजला. राजाने तो चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. गदिमांनी त्यांना दाखवला. त्यांना तो इतका आवडला की गदिमांना त्यांनी जवळ बोलावले व त्यांच्या पाठीवर थाप मारुन शाबासकी दिली. त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहायला लागले. उपरण्याने डोळे कोरडे करीत राजा म्हणाला, "पोरा, आपल्या औंधाचे नाव राखलेस. ह्याबद्दल मी तुला माझी पुण्यातली टिळकरोड (हा परिसर पंतांचा गोट म्हणून ओळखला जायचा.) वरची जागा दिली. तिथे तू आपला बंगला बांध आणि सुखाने संसार कर. जगदंबा तुझ्या पाठीशी आहे !"

ही जमीन नंतर गदिमांनी आपले मित्र सुधीर फडके यांना भेट दिली. बाबुजींनी या जागी आपली 'चित्रकुटी' नावाची वास्तू उभारली.
पुढे राजालाही जेव्हा कळले की गदिमांनी त्याजागी काही बांधले नाही ती जागा आपल्या मित्राला भेट दिली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले होते.

असा राजा.. असे गदिमा आता होणे नाही..

  सुमित्र माडगूळकर

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.