A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
योग्य समयिं जागविलें

योग्य समयिं जागविलें बांधवा, मला
लंकेवर काळ कठिण आज पातला

पाप्याप्रति आत्मघात
दुष्कर्त्म्या नरकपात
अटळचि जो नियतीनें नियम योजिला

तव मानसिं दर्प-गर्व
विषमय तव आयु सर्व
बोधशब्द कधिं न मधुर तुजसिं लागला

विभिषणकृत सत्यकथन
अप्रिय परि पथ्य वचन
झिडकारुन एक आप्त तूंच हरविला

मंदोदरि विनवी नित
हित गमलें तुजसि अहित
भाव तिचा पायतळीं व्यर्थ तुडविला

पाहुनिया देश समय
पडताळुन न्याय, अनय
कार्याप्रति हात कधी तूं न घातला

मनिं आला तो निर्णय
ना विचार वा विनिमय
सचिव कुणी पारखुनी तूं न पाहिला

प्रिय तितकें ऐकलेंस
अप्रिय तें त्यागिलेंस
यांत घात तूंच तुझा पूर्ण साधिला

उपदेशा हा न समय
लंकेशा, होइ अभय
कर्तव्या कुंभकर्ण नाहिं विसरला

बोलवि मज बंधुभाव
रणिं त्याचा बघ प्रभाव
रिपुरक्तें भिजविन मी आज पृथ्विला

सहज वध्य मजसि इंद्र
कोण क्षुद्र रामचंद्र !
प्राशिन मी क्षीरसिंधु, गिळिन अग्‍निला

वचन हाच विजय मान
करि सौख्यें मद्यपान
स्कंधीं मी सर्व तुझा भार घेतला
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - हिंडोल
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १६/२/१९५६
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- व्ही. एल्. इनामदार.
अनय - कपट, अन्याय.
कुंभकर्ण - रावणाचा बलाढ्य भाऊ. सहा महिने झोपून एक दिवस जागा होत असे. यास रावणाने मारले.
क्षीर - दूध.
दर्प - घमेंड / तोरा.
मंदोदरी - रावणपत्‍नी. हिने सीतेला रामाकडे परत पाठवून दे नाहीतर तुझा नाश होईल असे रावणास बजावले होते.
रिपु - शत्रु.
विभिषण - बिभिषण. रावणाचा भाऊ. सीतेस पळवून आणल्याबद्दल याने रावणास रागावले व तीस परत पाठवण्यास सांगितले. न होता हा रामाकडे गेला. रावणाच्या मृत्यूनंतर रामाने यास राज्य दिले.
स्कंध - खांदा.
सिंधु - समुद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण