A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चालली गोदावरी

ही गुणाची गोजिरी ग गौर माझी साजिरी
कोणत्या ग दूर देशी सोडुनिया रायरी
चालली गोदावरी!

साज घाला सोनियाचा कंकणे हिरवा चुडा
पाटली बिंदी बिजोरा गळसरीचा आकडा
केशरी कुंकू कपाळी साजते ही लाजरी
चालली गोदावरी!

सनई मंजुळ वाजतें हा सूरगंधाचा सडा
नादतिं घन दुंदुभि झडतो गडावर चौघडा
दूर रानी ऐकूं येई मोहनाची बासरी
चालली गोदावरी!

लागली हुरहुर जीवा चिंब डोळ्यांच्या कडा
पाहता हे रूपराणी जात ऐन्याला तडा
दृष्ट काढा ग सईची लोण राई-मोहरी
चालली गोदावरी!

वाट ही विसरूं नको माहेरची माझे सखी
ये कधीकाळी मुली ग ठेव बाई ओळखी
ग नको पाहूं वळोनी जा सुखे जा सासरी
चालली गोदावरी!
गीत- राजा बढे
संगीत - डी. पी. कोरगावकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट- राजगडचा राजबंदी
गीत प्रकार - चित्रगीत
दुंदुभि - नगारा, एक वाद्य.
लिंबलोण - दृष्ट काढण्याचे साहित्य.