A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अजून नाही जागी राधा

अजून नाही जागी राधा,
अजून नाही जागें गोकुळ;
अशा अवेळीं पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ.

मावळतीवर चंद्र केशरी;
पहाटवारा भवती भणभण;
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुलें तनमन.

विश्वच अवघें ओठां लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव;
डोळ्यांमधले थेंब सुखाचे :
"हें माझ्यास्तव.. हें माझ्यास्तव.."
कुब्जा - कंसदासी, तीन ठिकाणी वक्र होती. हिला कृष्णाने सरळ केले.
पावा - बासरी, वेणु.
रव - आवाज.
'कुब्जा' ही इंदिरा संतांची एक सुरेख जमलेली कविता आहे. तिला एक चांगल्या गीताचाही आकार आपोआप प्राप्त झाल्याने तिचे सौंदर्य द्विगुणित झाले आहे.

कवितेच्या पहिल्या दोन ओळीत कृष्णाच्या प्रेमक्रीडेशी अविभाज्यपणे निगडित असणारे 'राधा' आणि 'गोकुळ' हे दोन्ही संदर्भ नाकारलेले आहेत. वेळही भल्या पहाटेची 'अवेळ' आहे. त्यामुळेच जिला कृष्णाच्या प्रेमाचा कण किंवा क्षणही प्राप्त होणे अशक्य वाटत असते अशी कुब्जा आपले तनमन विसरून प्रेमाने मोहरून येऊ शकते. मावळतीवरील केशरी चंद्र आणि भोवतीचा भणभण पहाटवारा तिला अधिकाअधिक प्रीतिसन्‍मुख करतात. त्यामुळेच पैलतीरावर घुमणारा मंजुळ पावा ती अर्ध्या पाण्यामध्ये उभी राहून ऐकते. तो ऐकत असतानाच तिची प्रीतिसमाधी लागते. ('तिथेच टाकून अपुले तनमन' - म्हणजे समाधीअवस्था.) या समाधीअवस्थेत अवघे विश्वच ओठाला लावून कुब्जा तो मुरलीचा रव पिते. ही प्रीतिसमाधी भंग पावत असतानाही 'कृष्णाच्या मुरलीचे हे ध्वनी खास आपल्याचसाठी आहेत' अशी भावना होऊन प्रीतीमधील कृतकृत्यतेचे एक समाधान कुब्जा अनुभवत असते.

कुरूपतेला दुर्लभ असलेल्या सौंदर्यप्राप्तीचा क्षण येथे कवयित्रीने टिपलेला आहे. हा क्षण सर्वस्वाने अनुभवता यावा म्हणून कुरूपताही आपले 'तनमन' टाकले आणि व्यापक होऊन तो क्षण स्वीकारण्यासाठी धडपडते, असा एक वेगळाच अनुभव कवयित्री येथे व्यक्त करीत आहे. यादृष्टीने -
विश्वच अवघे ओठां लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
ह्या ओळींतून सूचित होणारा भावाशय मद्दाम निरीक्षण करावा असाच आहे. कृष्णाच्या मुरलीतून जे ध्वनी विश्वात वितरले गेलेत, त्यातील एकही ध्वनीवलय गमावले जाऊ नये, याची जणू एक दक्षता घेण्यासाठीच ही कुब्जा अवघे विश्व ओठाला लावीत आहे.

राधा जागी नाही, गोकुळही जागे नाही आणि कोणत्याही प्रकारच्या कृष्णसंलग्‍न गोष्टीचा अडथळा येणार नाही अशी 'अवेळ' असल्याने कृष्णप्रीतीचे हे क्षणदान कुब्जा पूर्ण समाधीनिशी आत्मसात करू शकत आहे. शिवाय कृष्णप्रीतीचे इतर सर्व घटक व संदर्भ अनुपस्थित असल्याच्या प्रकटअप्रकट जाणिवेमुळेच की काय कृष्णप्रीतीची ही अभिव्यक्ती फक्त आपल्यासाठी, केवळ आपल्या स्वत:साठी आहे, ही भावनाही एकाच वेळी तिला सुख देणारी व तृप्त करणारी आहे.
(संपादित)

डॉ. दत्तात्रय पुंडे, डॉ. स्‍नेहल तावरे
त्रिदल- बालकवी, कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या निवडक कविता
सौजन्य- स्‍नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे.

* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.