A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बर्फाचे तट पेटुनी उठले

बर्फाचे तट पेटुनी उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते

असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे?
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे?
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते

सह्यगिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे
एक हिमाचल राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे
समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहांत आज या एक मनीषा जागतसे
पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे धगधगते
गीत - कुसुमाग्रज
संगीत -
स्वर- आकाशवाणी गायकवृंद
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
असुर - राक्षस.
कृतांत - यम, मृत्यू.
कपार - खबदड.
कुहर - गुहा, दरी.
नौबत - मोठा नगारा.
साम - सलोखा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.