A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घन घन माला नभी

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा

कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो ओल्या अंधारा

वर्षाकालिन सायंकाळी
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठीस लागे भिरभिरता वारा

कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर- मन्‍ना डे
चित्रपट - वरदक्षिणा
राग - मल्हार
गीत प्रकार - चित्रगीत, ऋतू बरवा
केका - मोराचा टाहो.
कवाड - दरवाजाची फळी, दरवाजा.
कानन - अरण्य, जंगल.
कालिंदी - यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते.
रव - आवाज.
१२ जुलै १९६१. पुण्यात हाहाकार माजला होता. जो तो ओरडत पळत होता. 'पाणी आलं.. पाणी आलं..' गोष्टच तशी होती. पानशेत धरणाला मोठी भेग पडली होती. भारतीय जवानांनी अथक परिश्रम करुन वाळूची हजारो पोती रात्रभर रचली होती व रात्रीच फुटणारे धरण सकाळपर्यंत थोपवून धरलं होतं. पुणेकर झोपेत असताना रात्री पाणी आलं असतं तर पुण्यात प्रचंड जीवितहानी झाली असती, पण शेवटी व्हायचे तेच झाले. पहाटेपहाटे पानशेत धरण शेवटी फु़टलं व त्याच्यामुळे थोडया वेळाने पुढचे छोटे खडकवासला धरण पण फुटलं व पुण्यात पाणीच पाणी झालं. हाहाकार माजला. जो तो आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्‍नात होता.

पुणे-मुंबई रस्त्यावर असलेला गदिमांचा 'पंचवटी' बंगला, शिवाजीनगर स्टेशन पासून अगदी जवळ, मुळा नदी पासून जेमतेम ५०० मी अंतरावर असावा. पण थोडया उंच जागी असल्यामुळे पाणी बंगल्यापर्यंत आले नव्हते. बंगला पाण्याखाली गेला नव्हता. त्यामुळे आसपास नदीकाठची जवळजवळ १५०-२०० माणसे पंचवटीच्या आश्रयाला आली होती. पण हळूहळू पाणी वाढू लागले, पंचवटीच्या पहिल्या पायरीपर्यंत येऊन पोहचले, तशी गदिमांना चिंता वाटू लागली. पाणी पंचवटीत शिरले असते तर अनेकांचे प्राण धोक्यात आले असते. शेवटी गदिमांनी निर्णय घेतला की माणसांना हळूहळू जवळच असलेल्या शेतकी कॉलेज व त्याच्या आजुबाजूच्या परिसरात पोहोचवायचे. तो भाग अजून जास्त उंचावर होता.

गदिमांच्या सांगण्यावरुन जवळच राहणारा काची नावाचा माणूस आपली होडी घेऊन पंचवटीत आला. ७-८ माणसे एकावेळी, असे करुन पंचवटीतून माणसे पुढे जास्त सुरक्षित स्थळी पाठवायला सुरवात झाली. ही होडी ढकलायला होते स्वत: गदिमा, लेखक पु.भा.भावे, व्यंकटेश माडगूळकर, हिंदी साहित्यकार-लेखक हरी नारायण व्यास, रेडिओ कलाकार नेमिनाथ उपाध्ये, गदिमांचे मित्र बाळ चितळे.

गदिमांचे मित्र बाळ चितळे नदीच्या काठी पेठेत रहात होते. त्यांचे घर पण पाण्याखाली गेले होते. पण स्वत:च्या होणार्‍या नुकसानापेक्षा त्यांना चिंता लागली होती ती गदिमांच्या एका हस्तलिखीताची. गदिमांनी नुकतेच 'वरदक्षिणा' चित्रपटाची पटकथा लिहून त्यांच्याकडे दिली होती व पुराच्या तडाख्यात ती घरातच राहून गेली होती. त्या काळात झेरॉक्स वगैरे प्रकार नव्हते. त्यामूळे ती एकमेव प्रत होती व तीचे काय झाले असेल याची चिंता त्यांना लागून राहिली होती. होडीने माणसे पुढे जायला लागली. गदिमांच्या पत्‍नी, विद्याताईंनी हळदी-कुंकवाने पाण्याची - नदीची पूजा केली व प्रार्थना केली 'माते सर्वांचे रक्षण कर'.

पुढे काही तासांनी पाणी उतरण्यास सुरवात झाली. पुण्यात झालेल्या हानीचे चित्र सगळीकडे दिसतच होते. चितांक्रांत असणारे बाळ चितळे आपल्या घरी येऊन पोहोचले. घराचे दार उघडले. घरात सर्वत्र चिखल साचला होता. सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. भिंतीवर २-३ फुटांपर्यंत पाणी चढल्याच्या खुणा होत्या. गदिमांचे स्क्रिप्ट वाचणे शक्यच नव्हते. धडधडत्या हृदयावर स्वार होऊन चितळे आतल्या खोलीत पोहचले. पण काय आश्चर्य, समोरच्या टेबलावर गदिमांचे स्क्रिप्ट जसेच्या तसे पडले होते. कोरडेच्या कोरडे. पाण्याचा एकही थेंब त्यावर पडला नव्हता.

गंमत अशी झाली की जसेजसे पाणी वाढू लागले तसे तसे ते लाकडी टेबल पाण्यावर तरंगू लागले. पाणी जसे वाढले तसे पाण्याबरोबर ते टेबल वर तरंगत गेले व पाणी उतरताच त्याबरोबर खाली आले व गदिमांचे स्क्रिप्ट जसेच्या तसे राहिले ! बाळ चितळे धावत टेबलाजवळ गेले. स्क्रिप्ट चाळू लागले व समोरच गदिमांच्या सुंदर हस्ताक्षरातील गाणे लिहिलेले होते- 'घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा..'

याच दरम्यान परिसरात पुरानंतर पाणीटंचाई निर्माण झाली. पंचवटीपासून जवळच एक जुनी विहीर होती. गदिमांनी उद्योजक किर्लोस्करांना फोन लावला. गदिमांच्या शब्दाचा मान ठेऊन त्यांनी या विहीरीवर चक्क एक मोठा पंप लाऊन दिला व आसपासच्या लोकांची पाणीटंचाई दूर केली.. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याचा विसर गदिमांना कधीच पडला नव्हता. आपल्या साहित्यकृतीतून जितके शक्य होईल तितके समाजाचे उतराई होण्याचे प्रयत्‍न ते करत होते.

पुढे 'वरदक्षिणा' हा चित्रपट प्रदर्शीत झाला. हुंडा देणे-घेणे या अनिष्ट प्रथेवर हल्ला करणारा हा एक सामाजिक चित्रपट होता. 'घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा..', 'एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात..' सारखी अप्रतिम गाणी या चित्रपटात होती. हिंदी चित्रपट गायक मन्‍ना डे यांनी 'घन घन माला' हे गाणे आपल्या गायकीने अमर केले.

गदिमा मोठया अभिमानाने म्हणत..
''ज्ञानियाचा वा तुक्याचा,तोच माझा वंश आहे
माझिया रक्तात थोडा, ईश्वराचा अंश आहे.''

तुकारामाचे अभंग जसे पाण्यातून वर तरंगत आले. जणू तेच भाग्य गदिमांच्या 'वरदक्षिणा' या संहितेला लाभले होते !

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.