A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गोरीगोरीपान फुलासारखी

गोरीगोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण

गोर्‍यागोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्याची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण !

वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी
हरणाची गाडी तुडवी गुलाबाचे रान !

वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्याच्यापरी होऊ दोघे आम्ही सान !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- आशा भोसले
गीत प्रकार - बालगीत
गोरागोरापान - अतिशय गोरा.
वाण - रंग / वर्ण / नमुना.
सान - लहान.
'यमक'श्री गदिमा

"आनंद काव्य माझे, त्याच्या अनंत ओळी" असं सार्थ वर्णन गदिमांनी आपल्या काव्यरचनांचे केले आहे. 'आठवणीतली गाणी' या माझ्या संकेतेस्थळावर आज मितीस उपलब्ध असलेल्या ३१४३ गाण्यांपैकी तब्बल ४३३ गाण्यांमधून हे आनंद काव्य स्त्रवत आहे- यावरून गदिमा-गीते आपल्या काव्यजाणिवेचा केवढा अवकाश व्यापतात हे ठळकपणे समोर येतं.

या 'अनंत ओळीं'चं रसग्रहण आत्तापर्यंत असंख्य वेळा झालं आहे आणि होत रहावं. प्रत्येक विश्‍लेषण एक वेगळा प्रकाशझोत या रचनांवर टाकतं आणि मूळ काव्य या विविधरंगी झोतांमध्ये अधिकच झळाळतं. गंगाधर महाम्‍बरे या व्यासंगी कवीने खूप अभ्यासपूर्ण आणि सखोल असा गदिमांच्या काव्यप्रतिभेचा आस्वाद रसिकांना पुस्तक स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे. हे सगळं वाचल्यामुळे असेल कदाचित, नव्हे म्हणूनच, गदिमांची एखादी वेगळी खुबी नजरेस आली की त्यात बुडी मारण्याचा मोह अनावर होतो.

आज मी मला भावलेली गदिमांची 'यमक' हाताळणी, यावर काही म्हणावं असा विचार करते आहे. बघू कसं जमतंय ते..

व्याकरणाच्या दृष्टीने विचार केला तर 'यमक' हा एक शब्दालंकार आहे.. कवितेचं सौंदर्य वाढवण्याचं ते एक तंत्र आहे. पण गदिमा आपल्या प्रतिभेचा त्यावर मंत्र टाकतात. मग ती नुसती 'र' ला 'र' जोडण्याची यांत्रिकता किंवा अट्टहास राहत नाही तर ती अगदी सहज आणि ओघाने येणारी शब्दरचना होते. कधीकधी त्यात झालेली जुळणी आश्चर्याचा आणि आनंदाचा अनुभव एकाच वेळेस देते.
गीतकाराच्या अशा ज्या काही मर्यादा असतात.... कथेतील कुठला प्रसंग आहे, गाणारी व्यक्तीरेखा कशी आहे, या गीताने कथेच्या प्रवाहाचे कुठले वळण अपेक्षित आहे... गदिमांची सर्जशीलता या बंधनांना पार ओलांडून जाते.

याची उदाहरणे शोधताना 'गीतरामायण' जाणीवपूर्वक बाजूला ठेवू. कारण तो एक वेगळा विषय आहे. ('गीतरामायण- गदिमा आणि शेक्‍सपिअर' असं पूर्वी एकदा मी लिहिलं आहे.)
तसंच अगदी नेहमीचं 'त्या तिथे, पलीकडे… झाड एक वाकडे' किंवा 'घननिळा लडिवाळा' सारखं अनेक वेळा उद्धृत झालेलं पण बाजूला ठेवूया.
चला, काहीतरी वेगळं, त्यांच्या नेहमीच्या शे-सव्वाशे गाण्यांच्या पलीकडचं शोधू..

गदिमांनी यमक साधण्यासाठी केलेल्या शब्दांचा वापर आणि / किंवा ते ज्या पद्धतीने यमकावर land होतात (जसं पट्टीच्या गायकाने आधी लयीला हूल द्यावी मग अगदी अलगद पण नेमक्या समेवर उतरावं, तसं), दोन्हीही खूपच आकर्षक आहे. दोन्हीही बघू…

'प्रीत शिकवा मला' या चित्रपटात एक गाणं आहे. ती जी कुणी हे गाते तिला तिचं सगळं.. दिसणं, वागणं.. सगळंच, तिच्या प्रियकराच्या मनासरखं करायचं आहे. या एकाच विचाराने तिचं विश्व व्यापलं आहे. मग गदिमा लिहितात,
आवडसी तू, एक ध्यास तुझा घेतला
आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला..
.. या गीतात 'ओतला' हा तसा साधा शब्द पण कसा येतो ते पहा..
आवडीच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला..

'बैल' आणि 'सैल' हा तसा सरधोपट यमक पण जेव्हा तो 'सांगत्ये ऐका'तल्या 'झाली भली पहाट'मध्ये असा समोर येतो, तेव्हा केवळ दोन ओळीत गदिमांचा काव्यहंस आपल्यासमोर 'नादचित्र' रेखाटतो -
अंगे झिंझाडून सैल
उभे ठाकले रे बैल

याच चित्रपटात एक लावणी आहे. त्यात लावणीची अदा करणारीने साडी नेसली नाही तर अंगरखा घातला आहे. नेहमी साडी नेसणार्‍या स्त्रीने जर असा वेगळा वेष परिधान केला तर ती कशी अस्वस्थ होत याचे बारीक निरिक्षण करत गदिमा म्हणतात-
नसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा
दिलवरा दिल माझे ओळखा !

मापणे (मोजणे) या शब्दात जरा बदल करत, त्यावर कोकणी भाषेचे किंचित संस्कार गदिमा करतात आणि 'तिच्या घोवाला कोकण दाखव'ताना म्हणतात-
गोमू माहेरला जाते हो नाखवा
.. उंची माडांची जवळून मापवा

'झाली ग बरसात, फुलांची..' या गाण्यातली 'ती' खूप सुखात - आनंदात आहे. त्यामुळे तिला सर्वत्र सुगंधाने भारलेला वाटतो आहे. याचं वर्णन करताना ती म्हणते-
तळहातीच्या भाकित रेखा
जित्या जुईच्या झाल्या शाखा

वाम आणि डावा- असे दोन समानार्थी शब्द वापरत आणि 'व'चा अनुप्रास साधत, बन्सीधर कृष्णाचं चित्र गदिमा एखाद्या सिद्धहस्त चित्रकाराच्या शैलीत दोन स्ट्रोक्‍स मध्ये चितारतात -
वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरितो पावा
.. गोकुळीचा राजा माझा

होडीत एक गर्भार नार बसली आहे. त्यामुळे होडी कशी चालव हे नावाड्याला सांगताना तिच्या मैत्रिणी म्हणतात-
बेतात राहू दे नावेचा वेग
चालु दे नाव जसा श्रावण मेघ
.. निळा समिंदर निळीच नौका..

गदिमांनी गेयतेच्या परिमाणात न बसणार्‍या अनेक शब्दांचा वापर त्यांच्या गाण्यांमध्ये केला आहे. जसे,
सोलीव, सचिव, शाकारणी, हल्लरू, ओंडका, पानकळ्याची, कंगवा, अवेदा, आपसुख, पलटण, तोंडात बोटे घालणे, कोल्हाळ, अकिंचन, अप्पलपोट्या, पाणंद, वासक.. आणि चक्क यातील काही यमकाचे कार्य साधतात.

सचिव म्हणजे सेक्रेटरी. एका अतिशय निरागस युगुलगीतात -
डोळ्यापुढे दिसे गे मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचिव
.. याच गाण्यात 'सोलीव' शब्द पण फार चपखल बसला आहे.

पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
.. केसावरती लहर उठविली फिरवुन हळू कंगवा
इथे 'कंगवा' शब्द आपल्या भोवतीचा किळसवाणा गुंतवळा झटकतो आणि गोड वाटायला लागतो. सुलोचनाबाई चव्हाण गाताना त्यात आणखी माधुर्य आणतात.

ती एक खूप छोटी मुलगी आहे. परीकथांचं तिचं विश्व आहे. तिच्या दादाची बायको कशी असावी, असं ती स्वप्‍नरंजन करते आहे. वहिनी स्वप्‍नातलीच असल्याने तिचं सगळंच दैवी आहे. वहिनी गोरीपान आहे, तिची गाडी हरणांची आहे, तिची अंधारासारखी काळीभोर साडी आहे.. त्या साडीवर चांदण्या चिकटवल्या आहेत आणि त्या साडीचा पदर.. चमचमणार्‍या बिजलीसारखा झळाळता…
चांदण्याच्या पदराला बिजलीचा वाण..
दादा, मला एक वहिनी आण
गोरी गोरीपान, फुलासारखी छान..
इथे 'वाण' हा शब्द 'वर्ण' या अर्थाने येतो. (पी. सावळारामांनी पण तो या अर्थाने एका गाण्यात वापरला आहे. 'गव्हाळी वाणाचा तो हसरा मुखडा… प्रीत माझी पाण्याला जाते..')

पु. ल. देशपांडेंनी एकदा म्हंटलं होतं-
"अणिमा, महिमा, गरिमा…. सारखीच 'गदिमा' ही एक सिद्धी आहे. तिला परकाया प्रवेश करता येतो."
त्यामुळेच गदिमांना नेमक्या शब्दांत नेमके भाव व्यक्त करता येत असावेत.

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.