कुणाला प्रेम मागावे

कुणाला प्रेम मागावे ?
जिवाचे दु:ख सांगावे ?
मृगजळी का तरंगावे
कुणाला गात रंजावे ?

तूच ना प्रीतिचा पेला
दिला पण पालथा केला
तळमळे जीव तान्हेला
कुणासाठी जगी जगावे ?

तुझ्या शृंगारलीला या
बिचारी मोहिनी माया
किती आशेवरी वाया-
खुळ्या जिवास टांगावे ?

साथीचा साज विस्कटला
सूरांचा मेळ मग कुठला
दिलाचा दिलरूबा फुटला
कसे गाणे अता गावे ?
गीत- स. अ. शुक्ल
संगीत -
स्वर - मा. बसवराज
गीत प्रकार - भावगीत

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा